Diabetes Denial : मधुमेहाचे रुग्ण देशात दिवसेंदिवस वाढत आहेत. अगदी तरुणांपासून वयोवृद्ध लोकांमध्ये मधुमेह आढळतो. मधुमेहाचे लक्षण समजून त्वरित डॉक्टरांबरोबर संपर्क साधणे गरजेचे आहे. अनेक जण मधुमेहाकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यापासून दूर पळतात. याविषयी मॅक्स हेल्थ केअरचे एंडोक्रायनोलॉजी आणि डायबिटीजचे मु्ख्य डॉ. अंबरीश मिथल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती सांगितली.
डॉ. अंबरीश मिथल या संदर्भातील एक प्रसंग सांगतात, ‘मला मधुमेह आहे, यावर विश्वास बसत नाही’, असे ४२ वर्षांचे एक व्यावसायिक माझ्या टेबलासमोर ओरडून सांगत होते. ‘मला बरे वाटत आहे आणि माझ्या कुटुंबात यापूर्वी कुणालाही मधुमेह नव्हता. मी दिवाळीत भरपूर गोड खाल्ले, हेच माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे कारण आहे’ असे ते म्हणाले. उपाशीपोटी जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण हे १४५ mg/dl होते, पण जेव्हा त्यांनी पुन्हा उपाशीपोटी तपासणी केली तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण १३७ mg/dl होते आणि HbA1c म्हणजेच हिमोग्लोबिनला धरून असलेले रक्तातील साखरचे प्रमाण हे ७.४ टक्के होते. यामुळे त्यांना मधुमेह असल्याचे समोर आले, परंतु ते स्वीकारायला तयार नव्हते की त्यांना मधुमेह आहे. ”कदाचित मी ‘बॉर्डरलाइन’वर असू शकतो, पण मला मधुमेह नाही”, असे ते म्हणाले.
डॉ. अंबरीश मिथल सांगतात, “ही सामान्य गोष्ट नाही. खरं तर प्रश्न हा निर्माण होतो की, सुशिक्षित आणि एका जागरुक व्यक्तीने मधुमेह असल्याचे का स्वीकारले नाही. तपासणीदरम्यान रक्तातील साखरेच्या प्रमाणाचा आकडा असामान्य येत असला तरी ते स्वत: ठीक असल्याचे सांगत होते. खरंच काही प्रमाणात का असो, पण मानसिक शिस्त असणे गरजेचे आहे. विशेषत: तरुण वयोगटातील मुलं ज्यांनी नुकतीच करिअरला सुरुवात केली आहे, त्यांना बरं वाटत असले तरी मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.”
“मधुमेह हा आपल्या आहार आणि जीवनशैलीवर खोलवर निर्बंध आणतो. कदाचित लोकांना हे स्वीकारणे कठीण जाऊ शकते. टाइप २ मधुमेहामध्ये निरोगी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले, तर तुम्ही दीर्घकालीन आरोग्याच्या समस्यांपासून स्वत:ला वाचवू शकता. अनेकदा मधुमेह असलेल्या लोकांवर वेळेवर आणि लवकर उपचार केले जातात. या उपचारांमुळे त्यांचे आरोग्य मधुमेह नसणाऱ्या सामान्य लोकांपेक्षाही अधिक आरोग्यदायी आणि दीर्घकालीन होते”, असे डॉ. मिथल सांगतात.
हेही वाचा : Weight Loss : सणासुदीत गोड अन् तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढते; दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे?
डॉ. मिथल पुढे म्हणतात, “मधुमेहामुळे किडनी, हृदय, डोळे, पाय आणि अन्य अवयव निकामी होण्याची भीती वाटते, पण तुम्ही डोळे मिटून मधुमेह स्वीकारला व सोप्या पद्धतीने नियमांचे पालन केले, तर तुम्हाला जिंकल्यासारखे वाटेल.”
डॉ. मिथल यांच्यानुसार, ” काही लोकं मधुमेहाला खूप हलक्यात घेतात. जास्त महत्त्व देत नाही. त्यांना वाटते, “मी स्वत: सांभाळून घेईल. ही काही मोठी गोष्ट नाही”, खरं तर मधुमेह आजार हा रुग्णावर अवलंबून असला तरी त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि नियमित तपासणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.”
अनेक लोक अपराधीपणाची भावना घेऊन जगतात. “मी मोठी चूक केली असावी म्हणून मला मधुमेह झाला”, असे अनेक रुग्णांना वाटते. खरं तर निरोगी जीवन जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:ला आणि आजूबाजूच्या लोकांना दोष देऊन काहीही फायदा नाही.”
काही लोकं मधुमेह असल्याचे लपवतात. तरुण वयोगटात हे प्रमाण अधिक दिसून येते. त्यांच्यापासून लोकं दूर होतील, या भीतीने ते मित्र आणि सहकाऱ्यांपासून मधुमेह असल्याचे लपवतात, तर अनेक लोकं मधुमेह निदान झाल्यानंतर औषधी आणि इन्सुलिन स्वीकारताना जीवनशैलीत होणारा बदल नाकारतात. तु्म्ही जे खाता आणि तुमचे वजन किती आहे, याचा संबंध त्यांना समजून घेता येत नाही; त्यामुळे अनेकदा उपचारादरम्यान अडथळा निर्माण होतो. अनेक लोक हेसुद्धा मान्य करत नाही की, डोळ्यांची लक्षणे ही मधुमेहामुळे दिसून येतात.
हेही वाचा : Piles in Women : महिलांना ‘या’ कारणांमुळे होतो मूळव्याधीचा त्रास? जाणून घ्या लक्षणे अन् उपचार
डॉ. मिथल म्हणतात, “मधुमेह असल्याचे नाकारू नये, उलट त्याचा सामना करावा, हे आपल्यासाठी खूप जास्त गरजेचे आहे. लक्षात घ्या तुम्ही एकटे नाही, जवळपास चाळिशीतील २० टक्के लोकांना मधुमेह आहे आणि तुम्ही जेव्हा ६० वर्षांचे व्हाल, तेव्हा हा आकडा वाढून ४० टक्क्यांवर जाईल. याच्याशी सामना करणे आणि निरोगी जीवन जगणे शक्य आहे. तुमच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा आणि त्यांचा सल्ला ऐका.”
ते पुढे सांगतात, “मधुमेह असणे आणि याचा सामना करणे महत्त्वाचे असले तरी त्याचा भार तुम्ही डोक्यावर घेऊ नका. त्याचे वेड लागू देऊ नका. आजाराविषयी खूप जास्त लहान लहान गोष्टींचा विचार करणे मूर्खपणाचे लक्षण आहे, ज्यामुळे मधुमेह तुमच्या जीवनावर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करू शकतो. लक्षात घ्या, तुम्ही मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा, मधुमेहाला तुमच्यावर नियंत्रण मिळवू देऊ नका.”