“पल्लवी, तू सांगितल्याप्रमाणे मी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायला सुरुवात केलीये आणि माझी स्किन इतकी छान झालीये सध्या”
गौरी उत्साहाने सांगत होती. तिच्या या उत्साही आवाजावरून माझ्या मनात एक आठवण उलगडू लागली… आमच्या जुन्या घराच्या साफसफाई मध्ये एक भांड्याचा कप्पा सापडला. त्यात आमच्या आज्जीची जुनी भांडी होती; जी आईने जपून ठेवली होती. दुधाचं भांडं, पितळेची परात, तांब्याची कित्येक भांडी, पितळेची ताटं – भांड्यांचा काळपट सोनेरी खजाना पाहूनच काहीतरी भारी गवसलंय असं वाटलं. त्यातल्या काही भांड्यांवर मी ‘ही माझी भांडी’ असा एक हक्क जाहीर करून टाकला. पिढीजात खजिन्याचा वारसाहक्क वगैरे मिळाल्यावर जो आनंद होतो तसा हळुवार आनंद मला जाणवत होता. त्यातील काही भांडी रोज वापरायला काढावीत असं ठरलं आणि स्वयंपाक घरात चकचकीत स्टीलने व्यापलेली जागा सोनेरी, तांबूस रंगानी सुंदर दिसू लागली. घरातल्या या बदलाचा मला जंगी आनंद झाला होता.
आणखी वाचा: Health Special: पावसाळा, अशुद्ध पाणी आणि आजारांची मालिका
पोषणद्रव्यांचं योग्य प्रमाणात फायदे व्हावेत, म्हणून तांब्या- पितळेची भांडी वापरावीत ही आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली संकल्पना मात्र काही वर्षांपूर्वी हिंडालियम आणि अॅल्युमिनियमने स्वयंपाकघरात बस्तान मांडलं आणि स्वयंपाक घरातील सोनेरी चमक हळूहळू लोप पावली. अलीकडे पुन्हा विविध धातू आणि त्यातून प्यायले जाणारे पाणी याबाबत संशोधन पुढे येत आहे. आजच्या लेखात पाणी साठविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या भांड्याचा वापर करावा याबद्दल थोडंसं.
आणखी वाचा: Health Special: आरोग्यदायी केशर
शरीरातील अम्लांश आणि पाणी पिण्यामुळे त्यात होणार बदल हा आहार शास्त्रातील संशोधनाचा महत्त्वाचा विषय आहे. प्लास्टिक घरातून पूर्णपणे वजा करण्याची पहिली पायरी म्हणून पाणी पिण्याची भांडी किमान प्लास्टिकची नसावीत, हे पहिले पाऊल. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते योग्य धातूच्या भांड्यात साठवल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढणे, शरीरातील आम्लांशाचे संतुलन राखले जाणे असे फायदे होऊ शकतात. सूक्ष्मजैविकांमुळे होणारे आजार टाळण्यासाठी पाणी धातूच्या योग्य भांड्यात साठविणे अत्यावश्यक आहे.
प्राचीन काळापासून भारतीय आणि इजिप्शिअन राहणीमानात तांबे, सोने आणि चांदीचा वापर केवळ दागिने घडविण्यासाठी नव्हे तर पिण्याचे पाणी साठवण्यासाठीही करण्यात आला आहे. आयुर्वेदामध्ये तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी साठवून ते सकाळी प्यावे असे आवर्जून सांगितले जाते. शरीराचे तापमान संतुलित राखणे, शरीराचा pH सांभाळणे, पोटाचे विकार कमी करणे, स्त्रियांमध्ये संप्रेरकांचे संतुलन राखणे इत्यादी साठी हे पाणी गुणकारक आहे. केवळ तांब्याच्या भांड्यात पाणी उकळून ते पिऊ नये. जास्त तापमानामध्ये पाण्यात तांब्याचे अंश मोठ्या प्रमाणात तयार झाल्यास पेशीच्या आवरणाला नुकसान होऊ शकते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात साठविले जाणारे पाणी हे शक्यतो खूप गरम असू नये. ते आजूबाजूला असलेल्या सरासरी तापमानातच (room temperature) साठवणे आवश्यक आहे. कांस्याच्या भांड्यात साठविलेले पाणीदेखील तितकेच फायदेशीर आहे. ज्या व्यक्तींना आमवात, संधिवात आहे त्यांनी कांस्याच्या भांड्यात साठविलेले पाणी जरूर प्यावे. कांस्याच्या भांड्यात पाणी उकळून ते थंड करून देखील प्यायले जाऊ शकते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि विविध प्रकारच्या कर्करोगासारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी कांस्याचा भांड्याचा वापर उपयुक्त ठरू शकतो.
स्टेनलेस स्टील
या भांड्यांचा असा काही विशेष नाही. वापरायला सोपी आणि अत्यंत कमी परिणामकारक अशी स्टीलची भांडी पाण्यातील सूक्ष्मजीवांवर काहीही परिणाम करत नाहीत. पाणी उकळण्यासाठी उत्तम म्हणून स्टीलचा वापर करायला हरकत नाही. स्टीलच्या भांड्यांमुळे पाण्यातील जिवाणूंचे प्रमाण तितकेसे कमी किंवा जास्त होत नाही. मात्र स्टीलच्या भांड्यांमुळे इतर धातूंमुळे मिळणारे अँटिऑक्सिडंट्स मिळत नाहीत. उत्तम प्रकारचे स्टील नेहमीच्या वापरात येऊ शकते.
पितळ
वापरायला सोपा आणि साठवणीसाठी अवघड असे पितळ पूर्वापार केवळ पाणीच नव्हे तर जेवणासाठीदेखील वापरले जाते. ज्यांना त्वचेच्या तक्रारी आहेत त्यांनी पितळेच्या भांड्यातून पाणी जरूर प्यावं. एका संशोधनात पितळेच्या भांड्यातील पाण्यामध्ये पाण्यातील जैविकांचे प्रमाण पितळेच्या भांड्यात साठविलेल्या पाण्यात अत्यल्प असल्याचे आढळून आले आहे.
पाण्यातील जिवाणूंवर संशोधन होण्यापूर्वी ग्रीक शहरीकरणाच्या इतिहासामध्ये पाणी वाहून नेण्यासाठीची व्यवस्था तांब्याच्या नलिकेतून केली जात असल्याचे उल्लेख आहेत. आज प्रगतीपथावर असताना पाण्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा विळखा आहे. हा विळखा कमी करण्यासाठी, आणि शक्य तितक्या स्वच्छ पाण्याचे सेवन करण्यासाठी तांबे, पितळ, कांस्य यांचे आपल्या आयुष्यातील पुनरागमन आवश्यक आहे .