Smoking in the first 30 minutes at morning: ज्याप्रमाणे अयोग्य आहार तुमच्या आरोग्यावर परिणाम करतो, त्याचप्रमाणे चुकीची लाइफस्टाइलही शरीराला आतून पोखरत जाते. चुकीच्या लाइफस्टाइलचा अर्थ तुमच्या त्या सवयी ज्या तुमचं आरोग्य हळूहळू बिघडवतात. अशाच सवयींपैकी एक म्हणजे धूम्रपान. धूम्रपान हे एखाद्या सायलेंट किलरप्रमाणे तुमच्या शरीरावर परिणाम करते. पण तुम्हाला हे माहीत आहे का दिवसभरातल्या या एका वेळी धूम्रपान केल्याने होणारं नुकसान अनेक पटीने वाढतं. अनेकदा लोकांना सकाळी उठल्यावर पोट साफ करण्यासाठी धूम्रपानाचा आधारा घ्यावा लागतो. पण ही सवय तुमची फुप्फुसं आणि ह्रदयावर खूप गंभीर परिणाम करते.

पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विकास मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी उठताच केलेले धूम्रपान हे दिवसभरातील सर्वात घातक असे धूम्रपान ठरू शकते. तुम्ही चैन स्मोकर नसलात, तरी सकाळचे हे पहिले झुरके तुमच्या फुप्फुसांवर आणि ह्रदयावर अनेक पटीने वाईटरित्या प्रभाव करतात.

डॉ. मित्तल सांगतात की, जेव्हा शरीर झोपेतून जागे होते तेव्हा ते एकप्रकारे रिसेट मोडमध्ये असते. त्यावेळी फुप्फुसं ही अधिक संवेदनशील परिस्थितीत असतात. हार्मोन उच्च पातळीवर असतात आणि शरीर नाजूक अवस्थेत असते. हेच कारण आहे की सकाळी सकाळी धूम्रपान करणं मोठी रिस्क मानले जाते. एखादी व्यक्ती दिवसभरात कमी धूम्रपान करत असेल, तरीही सकाळची ही वेळ घातक ठरू शकते. सकाळच्या वेळी धूम्रपान करणे जास्त हानीकारक का आहे आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होत हे जाणून घेऊ…

सकाळची वेळ जास्त हानीकारक

तुम्ही झोपलेले असताना तुमच्या फुप्फुसांना टॉक्सिनपासून सुटका मिळते असते आणि ते रिपेअर मोडमध्ये येतात. मात्र उठल्यावर धूम्रपान केल्याने ही रिपेअरची प्रोसेस मध्येच थांबते. सिगारेटमधील केमिकल्स फुप्फुसांना लगेच नुकसान करतात. यामुळे टॉक्सिन्स शरीरात झपाट्याने खेचले जातात. तसंच जे लोकं सकाळी उठल्यावर ३० मिनिटांच्या आत धूम्रपान करतात, ते हे टॉक्सिन्स आणखी खोलवर आत शोषून घेतात. यामुळे आणखी नुकसान होते. सकाळी उठताच धूम्रपान केल्याने कॅन्सरला कारणीभूत घटकांचा प्रभाव वाढतो. रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि ह्रदयासंबंधित आजारांचा धोका वाढतो.

फुप्फुसांवर पहिल्या काही मिनिटांचा मोठा प्रभाव

डॉक्टर सांगतात की, झोपेनंतर फुप्फुसं कमी म्यूकस आणि प्रोटेक्टिव्ह सीक्रेशनने झाकलेले असतात. म्हणजेच धुरातील टॉक्सिन्स थेट फुप्फुसांवर आदळतात आणि चिकटून राहतात.

मेंदूवरही होतो परिणाम

सकाळी केलेले धूम्रपान तुम्हाला दिवसभर त्या व्यसनासाठी तयार करते. यामुळे हे व्यसन तीव्र होत जाते. अनेक जण म्हणतात की सकाळी केलेले धूम्रपान त्यांना जास्त हिट करतं. मात्र, हा ऑक्सिजनची कमतरता आणि नर्व्हस सिस्टिमवर दाब येण्याचे संकेत देते. याचा शरीरावर सायलेंट किलरसारखा प्रभाव होतो.

सकाळच्या वेळी शरीरात कॉर्टिसॉल आणि एड्रेनालिन हार्मोन जास्त असतात, यामुळे माणूस सतर्क आणि एकाग्र राहतो. मात्र, जेव्हा तुम्ही सकाळी निकोटीनच्या संपर्कात येता तेव्हा ते तणाव आणखी वाढवते.

रोज सकाळी सिगारेट ओढल्याने ह्रदयासंबंधित धोका आणखी वाढतो. रक्तदाब वाढतो. ही सवय कार्डिओव्हॅस्क्यूलर सिस्टिमवर दबाव वाढवते. लोकांना सकाळच्या धूम्रपानाने निवांत व्हायचं असतं मात्र तेच त्यांचा तणाव दुपटीने वाढवते. या सवयीच्या आहारी गेल्याने हायपरटेन्शन, डिप्रेशन, हॉर्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.