scorecardresearch

Premium

Mental Health Special: यूट्यूबच्या मतांच्या बाजारात…

Mental Health Special: फिल्टर बबल म्हणजे बौद्धिक अलगवादाची अर्थात इंटलेक्चुअल आयसोलेशनची अवस्था. बौद्धिक एकटेपणाची ही अवस्था माणसांना इतरांचे काहीही ऐकण्यापासून, समजून घेण्यापासून परावृत्त करते.

youtube influencer social media teenagers
युट्यूब सोशल इन्फ्लुयएन्सर्स (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोशल मीडिया पाठोपाठ जेन झी दुसरं काही सतत बघत असतील तर ते युट्युब आहे. युट्युबवरचे इन्फ्लुएन्सर्स आणि त्यांनी बनवलेले वेगवेगळे व्हिडीओ हा जेन झी टिनेजर्सच्या रोजच्या स्क्रीन टाइममधला मोठा खुराक असतो. यात आवडत्या गायक गायिका, अभिनेता अभिनेत्री विषयीचे व्हिडीओज आणि इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडीओ, अपडेट्स तर असतातच पण ही तरुण होणारी, झालेली पिढी मोठ्या प्रमाणावर क्रिटिसाईज व्हिडीओ बघते. म्हणजे असेल व्हिडीओ ज्यात एखादा मुद्दा घेऊन त्यावर कुणीतरी एक जर भाष्य करत असतो. हे व्हिडीओ ऑडिओ पॉडकास्ट प्रकारातले काही वेळा असतात तर काहीवेळा निरनिरळ्या दृश्यांवर संगणकाच्या माध्यमातून कृत्रिम आवाजात केलेलं भाष्य असतं. अशा अनेक युट्युबर टीकाकारांना स्वतःची ओळख, परिचय, चेहरा, आवाज यांची ओळख करून द्यायची नसते, त्यामुळे ते कॉम्पुटराइज्ड आवाज वापरून टीका करणारे व्हिडीओ टाकत असतात. काहीवेळा दोन युट्युबर्स एकत्र येऊन अशा प्रकारचे टीका करणारे व्हिडीओ तयार करतात. यातही काही प्रकार दिसतात. काही युट्युबर्स खरोखरच अभ्यासपूर्ण विश्लेषण करत असतात. किंवा विश्लेषण म्हणण्यापेक्षा सुद्धा त्यात मत प्रदर्शन जास्त असतं पण ते थिल्लर नसतं. त्यांची मतं, निरीक्षणं, नोंदी ते मांडत असतात. त्याला थोड्याफार प्रमाणात का होईना अभ्यासाची/गृहपाठाची जोड असते. तर काही युट्युबर्स केवळ मतप्रदर्शन करत एखाद्या विषयाला घेऊन टीका करत राहायची या पद्धतीने अत्यंत वाचाळ, काहीवेळा थिल्लर पद्धतीचे व्हिडीओ तयार करतात. या दोन्हीला जेन झी मध्ये जबरदस्त फॉलोईंग आहे.

आणखी वाचा: Mental Health Special: शाळकरी मुलांहाती मोबाईल: फायद्यापेक्षा

Shukra Gochar 2023
नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? शुक्रदेव गोचर करताच माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता लखपती
International Music Day
International Music Day : ‘म्युझिक थेरपी’ म्हणजे काय? या उपचाराच्या मदतीने मानसिक आजार दूर होऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
diet for healthy heart
Health Special: हृदयाच्या आरोग्यासाठी काय आहार असावा?
Gold Silver Price
Gold-Silver Price on 25 September 2023: सकाळ होताच सोनं झालं स्वस्त, १० ग्रॅमचा भाव पाहून ग्राहकांची गर्दी

आता तुम्हाला वाटेल यात प्रॉब्लेम काय आहे?
तर, जे सोशल मीडियावर मोठ्यांच्या जगात दिसतं तेच युट्युबवर टिनेजर्स आणि तरुणतरुणींच्या जगात दिसतंय. कसलाही विशेष अभ्यास नसताना, अचूक माहिती नसतानाही अनेकदा निव्वळ हेटाळणी केल्यासारखं, ज्याला जेन झी भाषेत रोस्ट करणं म्हणतात, त्या पद्धतीने भाष्य करत राहण्याचा ट्रेंड या क्रिटिक व्हिडीओज मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागला आहे. एखादा विषय, व्यक्ती, मुद्दा घ्यायचा आणि त्यावर यथेच्छ तोंडसुख घ्यायचं. म्हणायचं टीका पण ते एक प्रकारचं ट्रॉलिंगचं असतं. याचा परिणाम म्हणजे टीन्स प्रत्यक्ष आयुष्यातही गोष्टींकडे एकांगी नजरेनं बघायला सुरुवात करतात. एखादी घटना घडते, एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट पद्धतीने वागते तेव्हा त्यामागे अनेक कारणं असू शकतात, त्यातली अनेक कारणं आपल्यासमोर येतातच असं नाही अशावेळी घटनांकडे, व्यक्तींकडे तर्कशुद्ध पद्धतीनं जे बघणं गरजेचं असतं हा सगळा विचारच या यूट्यूबच्या व्हिडिओच्या पॅटर्नमुळे हळूहळू पुसत चालला आहे. कुठेतरी हळूहळू मी म्हणतोय तेच आणि तेवढंच बरोबर आहे, बाकी मतं, विचार आणि बाजू याला काही तसा विशेष अर्थ नाही अशी मनोधारणा तयार व्हायला सुरुवात होते. सोशल मीडियावर सतत मतप्रदर्शन करणाऱ्या अनेकांमध्ये हे दिसून येतं. त्यांना वेगळी मतं पटत नाहीत, चालत नाहीत. वेगळ्या बाजू लक्षात घ्या म्हटलं की त्यांना राग येतो. तसाच काही प्रकार या क्रिटिक युट्युबर्समुळे आता टीनएजर आणि तरुण तरुणींमध्ये बघायला मिळतो आहे. आवडता इन्फ्लूएंसार जे सांगतो तेच फक्त बरोबर आहे असंही वाटायला लागतं जे अतिशय धोकादायक आहे. कारण या सगळ्यात मोठे असू देत नाही तर लहान सगळे एका फिल्टर बबल मध्ये अडकलेले असतात.

आणखी वाचा: सर्फिग : हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा

फिल्टर बबल ही संकल्पना ‘एली पॅरीसर’ या सोशल मीडिया कार्यकर्त्यांनी २०१०मध्ये पहिल्यांदा मांडली. फिल्टर बबल म्हणजे बौद्धिक अलगवादाची अर्थात इंटलेक्चुअल आयसोलेशनची अवस्था. बौद्धिक एकटेपणाची ही अवस्था माणसांना इतरांचे काहीही ऐकण्यापासून, समजून घेण्यापासून परावृत्त करते. आपल्या डिजिटल फूटप्रिंट्समुळे युजरला जे दिसायला हवंय तेच सतत दिसत रहात. युजरला काय बघायला आवडेल याचा निर्णय युजरच्या हातात न राहता तो तंत्रज्ञानाच्या हातात जातो किंवा गेला आहे. या फिल्टर बबलमुळे माणसं त्याच त्या चौकोनात अडकतात आणि तेच ते बघत, ऐकत बसतात. सतत आपल्याला आपल्याच आवडीनिवडींची माहिती मिळत राहणं आणि आपल्या वर्तुळाच्या पलीकडचे काहीही आपल्यापर्यंत न पोचणं हे भयावह असू शकतं. विशेषतः वाढीच्या मुलांच्या संदर्भात. जेव्हा मतं बनत असतात, जगाचा प्रत्यक्ष अनुभव येण्याआधीच अमुक तमुक म्हणजे हेच तेच अशी ठाम मतं अनेकदा या रोस्ट करणाऱ्या युट्युब व्हिडीओमुळे तयार होतात. पक्की होत जातात आणि आपल्याला किंवा आपल्याला आवडणाऱ्या युट्युबरला जेवढं माहित आहे त्यापलीकडेही अजून बरंच काही असू शकतं जे माहित करून घेणं अत्यावश्यक आहे हा विचारच मागे पडतो. जमिनी वास्तवापासून ही मुलं झपाट्याने दूर जातात. प्रत्यक्ष अनुभव कमी पण ऐकीव माहितीच्या आधारावर बनलेली ठाम मतं असं काहीतरी त्यांचं होऊन बसतं.

इंटरनेटमुळे हे मोठ्यांचं होत नाही का?
तर होतंच, पण मुलांच्या बाबतीत काळजी एवढ्यासाठी करायला हवी की त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी काही वेळा हे घातक असू शकतं. एक जबाबदार नेटकरी म्हणून हे घातक असू शकतं. आणि पुढे जाऊन एक जबाबदार नागरिक म्हणूनही हे अत्यंत धोकादायक आहे. दुसरी बाजू समजून न घेता, एखाद्या विषयाचा सर्वांगीण विचार न करता समज करुन घेणं, एखाद्यावर प्रचंड टीका करणं, निंदा नालस्ती करणं, टीकेच्या नावाखाली ट्रोलिंग करणं या सगळ्या गोष्टींची सुरुवात अशाच फिल्टर बबल्समधून होते. त्यामुळे सजग राहायला हवं. आपलं मूल युट्युबर गाणी, गेम्स न बघता काहीतरी वैचारिक खुराक देणारं बघतंय अशा भ्रमात राहू नका. जे काही वैचारिक आपलं मूल बघतंय ते सकस आणि समतोल वैचारिक टीका टिप्पणी आहे की रोस्टिंग सुरु आहे याकडे लक्ष देणं आणि मुलांशी बोलणं आवश्यक आहे.

आपल्याला आपले टीन्स जागरूक हवे आहेत, सजग वापरकर्ते हवे आहेत, उद्याची ट्रोल सेना आपल्याला तयार होऊ द्यायची नाहीये हे कायम लक्षात ठेवायला हवं!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youtube influencers social media filter bubble hldc psp

First published on: 31-07-2023 at 18:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×