Symptoms of Heart Disease: हृदय निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. वाईट आहार, बिघडणारी जीवनशैली व ताणतणाव यांमुळे हृदयाचे आरोग्य बिघडत आहे. आहारात जंक फूड, निरोगी चरबी व खारट अन्न हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचवते. हृदयरोग वाढण्यामागे अनेक कारणे जबाबदार आहेत; जसे की, शारीरिक हालचालींचा अभाव, जास्त वेळ बसून काम करणे, लठ्ठपणा, जास्त वेळ बसून काम करणे हृदयरोगांना आमंत्रण देते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हृदयरोग असतो तेव्हा शरीरात दिसणाऱ्या पहिल्या लक्षणांपैकी एक म्हणजे छातीत तीव्र वेदना होणे. ही वेदना बहुतेकदा छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला जाणवते. कधी कधी याला दाब, घट्टपणा किंवा जडपणाची भावना म्हणूनदेखील वर्णन केले जाते. ही वेदना काही मिनिटे टिकते आणि कधी कधी जास्त काळ टिकू शकते.
पण, तुम्हाला माहीत आहे का की, हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्येत केवळ छातीत दुखणेच नाही, तर इतर अनेक लक्षणेदेखील दिसून येतात. या लक्षणांबद्दल जाणून घ्या.
- चिंताग्रस्त वाटणे
- पायांना सूज येणे
- घाम येणे
- मळमळ किंवा उलट्या होणे
- चक्कर येणे किंवा अशक्त होणे
बहुतेक लोकांना असे वाटते की, हृदयाच्या समस्या छातीत दुखण्याने सुरू होतात; परंतु हे खरे नाही. हृदयरोग तज्ज्ञ, एमडी, डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आणि हृदयरोगाची काही लक्षणे स्पष्ट केली, जी लोक सहसा दुर्लक्ष करतात. डॉ. यारानोव्ह हृदयरोगाच्या पाच विचित्र आणि सर्वांत दुर्लक्षित होणाऱ्या सावधगिरीच्या लक्षणांबद्दल सांगतात जे सूचित करतात की, तुमचे हृदय अडचणीत असू शकते. जर तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण जाणवत असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी बोलायला विसरू नका. शरीरात दिसणारी हृदयाशी संबंधित आजारांची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.
दात किंवा जबड्यात वेदना
जर तुम्हाला जबड्यात किंवा दातांमध्ये वेदना होत असतील, तर त्या हृदयाशी संबंधित वेदनादेखील असू शकते. ही समस्या विशेषतः महिलांमध्ये सामान्य आहे. बहुतेकदा लोक याला दातांची समस्या मानतात; परंतु ते अँजायना किंवा हृदयविकाराचे लक्षणदेखील असू शकते. दात व जबड्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण- ते हृदयाच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
पायांना सूज येणे
पायांना सूज येणे हे हृदयातील एखाद्या प्रकारच्या समस्येचे लक्षण असू शकते. जर तुमचे हृदय योग्यरीत्या रक्त पंप करू शकत नसेल, तर तुमचे पाय सुजू शकतात. हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, या स्थितीत शरीराच्या खालच्या भागात द्रव जमा होतो, ज्यामुळे सूज येते. ही सूज विशेषतः रात्रीच्या वेळी वाढू शकते म्हणून ती गांभीर्याने घेतली पाहिजे आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; अन्यथा हृदयविकार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
श्वास घेण्यास त्रास
जर तुम्हाला झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्याला ऑर्थोप्निया म्हणतात. हे बहुतेकदा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचे लक्षण असते. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि रात्री झोपायला त्रास होत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे.
सतत घाम येणे आणि मळमळ होणे
हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, सतत घाम येणे व मळमळ होणे ही बहुतेकदा अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असू शकतात. तसेच घामासोबतच रुग्णाला थकवा, चक्कर येणे किंवा तणाव, अशी लक्षणेदेखील जाणवू शकतात.
इरेक्टाइल डिसफंक्शन
हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले की, इरेक्टाइल डिसफंक्शन हे हृदयरोगाचे एक दुर्लक्षित लक्षण आहे. तज्ज्ञांच्या मते, लिंगापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या कोरोनरी धमन्यांपेक्षा लहान असतात. इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या हृदयरोगाचे लक्षण असू शकते.