Hero MotoCorp च्या ‘करिझ्मा’ची स्पोर्ट्स बाइकप्रेमींमध्ये नेहमीच विशेष क्रेझ राहिली आहे. पण तरुणाईमध्ये चांगल्याच लोकप्रिय असलेल्या या प्रीमियम बाइकचा 16 वर्षांचा प्रवास आता थांबण्याची शक्यता आहे. कारण, कंपनीकडून गेल्या सहा महिन्यांपासून या स्पोर्ट्स बाइकच्या एकाही युनिटची निर्मिती करण्यात आलेली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून या बाइकचं प्रोडक्शन बंद आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कंपनीकडून एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 दरम्यान Karizma च्या एकाही युनिटची निर्मिती झालेली नाही. यापूर्वी कंपनीकडून करिझ्माचं प्रोडक्शन बंद करणार नाही असं सांगण्यात आलं होतं. परदेशात या बाइकची निर्यात सुरु राहिल असे या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने सांगितले होते. मात्र, त्यानंतर अद्यापपर्यंत गेल्या सहा महिन्यात कंपनीकडून एकही बाइक निर्यात करण्यात आलेली नाही. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार गेल्या काही काळापासून या बाइकच्या विक्रीमध्येही घट झाली आहे.
आणखी वाचा- Hyundai Venue ची ‘सुपर क्रेझ’, बुकिंग 75 हजारांपार
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या नव्या नियमांनुसार अर्थात भारत स्टेज 6 (BS-VI) मानकाच्या सक्तीमुळे कंपीनीने या बाइकचं प्रोडक्शन बंद केल्याचं वृत्त आहे. Karizma या नव्या मानकांमध्ये बसत नाही. याशिवाय Karizma चे इंजिन बीएस 6 मध्ये अपग्रेडही करता येणार नसल्यामुळे बाइकचं प्रोडक्शन बंद होत आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
2003 मध्ये सर्वप्रथम लाँच झालेली ही बाइक कंपनीने 2018 मध्ये काही नव्या अपडेट्ससह सादर केली होती. ZMR मध्ये में 223 सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर इंजिन असून हे इंजिन 20.2 हॉर्सपावरची ऊर्जा आणि 19.7Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स असून दोन रिअर शॉक अॅब्जॉर्बर आहेत. 15.3 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी यामध्ये आहे. 2003 मध्ये लाँचिंगवेळी बॉलिवूड स्टार ह्रतिक रोशन ब्रँड अॅम्बॅसिडर राहिलेल्या या बाइकची “Jet Set Go” या टॅगलाईनसह जाहिरात करण्यात आली होती.