High Blood Sugar Symptoms: डायबिटीज हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये रक्तातील साखरेचं (ग्लुकोजचं) प्रमाण खूप जास्त वाढतं. ग्लुकोज हे शरीरासाठी मुख्य ऊर्जेचं स्रोत असतं आणि हे आपल्याला खाल्लेल्या अन्नातून मिळतं. इन्सुलिन नावाचं हार्मोन, जे पॅन्क्रियास नावाच्या ग्रंथीतून तयार होतं, ते या अन्नातून मिळालेल्या ग्लुकोजला शरीराच्या पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम करतं, जेणेकरून तो ऊर्जा म्हणून वापरता येईल.

पण, काही वेळा शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार झालेलं इन्सुलिन योग्य पद्धतीने वापरू शकत नाही. अशा वेळी ग्लुकोज रक्तातच साचून राहतं आणि पेशींना मिळत नाही, त्यामुळे शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळत नाही आणि रक्तातील साखर खूप वाढते. रक्तात साखरेचं प्रमाण वाढल्यावर शरीरात काही लक्षणं दिसू लागतात.

डायबिटीजची लक्षणं म्हटलं की सहसा जास्त भूक लागणे आणि वारंवार लघवी होणे हीच लक्षणं वाटतात. पण, चेन्नईच्या डायबिटीज स्पेशालिटी सेंटरचे अध्यक्ष डॉ. मोहन यांनी सांगितलं की, डायबिटीजची लक्षणं त्वचेपासून शरीराच्या इतर भागांपर्यंत दिसतात. जर वेळेत रक्तातील साखर वाढण्याची लक्षणं ओळखली गेली, तर रक्तातील साखरेचं प्रमाण सहजपणे नियंत्रणात आणता येतं. चला तर मग पाहूया, रक्तातील साखर जास्त झाली की शरीरात कोणती लक्षणं दिसतात.

त्वचेवर खाज येणे (Diabetes Symptoms)

ज्यांचं ब्लड शुगर जास्त असतं, त्यांना मांड्यांमध्ये आणि काखेमध्ये खूप खाज येते. डायबिटीजमध्ये त्वचेची ओलसरता टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे त्वचा कोरडी होऊन खाज सुटते. हे घाम आणि त्वचेतील तेल ग्रंथी नीट काम न केल्यामुळे होतं. त्यासोबतच रक्ताभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) नीट न झाल्यामुळे त्वचेला योग्य पोषण मिळत नाही आणि त्यामुळे ही समस्या अधिक वाढते.

वजन कारण नसताना कमी होणे (Diabetes Signs)

जेव्हा शरीराला अन्नातून ऊर्जा मिळत नाही, तेव्हा शरीर स्नायू आणि चरबी जाळून ऊर्जा तयार करतं, ज्यामुळे वजन अचानक कमी होऊ लागतं, जरी खाणेपिणे नियमित असलं तरीही. हे डायबिटीजचं एक मोठं लक्षण असू शकतं, जे अनेक वेळा लोक दुर्लक्ष करतात.

खूप जास्त थकवा येणे

वारंवार लघवीला जावं लागत असल्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं आणि त्यामुळे अशक्तपणा व थकवा जाणवतो. शरीराला योग्य प्रमाणात ग्लुकोज मिळत नाही आणि हेच ऊर्जा कमी होण्याचं मुख्य कारण असतं.

डोळ्यांनी धुसर दिसणे किंवा दृष्टी कमी होणे

जास्त ब्लड शुगरमुळे डोळ्यांतील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचतं, ज्यामुळे धुसर दिसू शकतं. वेळेवर उपचार न केल्यास डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं आणि डोळ्यांशी संबंधित गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

जखमा हळूहळू भरून येणे

ब्लड शुगर जास्त झाल्यामुळे नसांना आणि रक्तवाहिन्यांना नुकसान होतं, त्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्व जखमेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्यामुळे जखमा भरायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत हाता-पायांना झिणझिण्या येणे, सुन्नपणा किंवा जळजळ होणे हे लक्षणंही जाणवू शकतात.

गरगरणे

ब्लड शुगर जास्त झाल्यास शरीर डिहायड्रेट होतं, त्यामुळे काही वेळा गरगरायला लागतं. जास्त ब्लड शुगरमुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि आठवणशक्ती यावरही परिणाम होतो. हे लक्षण सुरुवातीला साधं वाटू शकतं, पण हे गंभीर कारण असू शकतं.

चिडचिडेपणा आणि मूड स्विंग्स

ब्लड शुगर अचानक वाढल्यावर किंवा घटल्यावर मनःस्थितीत झपाट्याने बदल होतो. व्यक्ती लहानसहान गोष्टींवर चिडू लागतो आणि मानसिक अस्थिरता जाणवते. हे लक्षण मानसिक थकवा आणि ब्लड शुगर असंतुलित असल्याचं संकेत असू शकतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्वासामधून विचित्र वास येणे

जेव्हा शरीरात इन्सुलिनची कमतरता असते, तेव्हा शरीर चरबी जाळून ऊर्जा तयार करतं. या प्रक्रियेमध्ये कीटोन्स तयार होतात, जे तुटून अ‍ॅसिटोनमध्ये बदलतात, त्यामुळे श्वासामधून नेल पॉलिशसारखा वास येऊ लागतो. हे कीटोएसिडोसिसचं लक्षण असू शकतं, जी एक वैद्यकीय आणीबाणीची स्थिती आहे.