High Cholesterol Warning Signs: आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल म्हणजे केवळ एक फॅटी पदार्थ नाही, तर तो अनेक गंभीर आजारांचा ‘सायलेंट किलर’ ठरू शकतो. अनेक वेळा शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण धोक्याच्या पातळीवर पोहोचतं; पण त्याची सुरुवातीची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र काळ जसजसा पुढे जातो, तसतशी शरीराच्या काही भागांत विशेषतः डोळे, पाय आणि जीभेवर काही सूक्ष्म चिन्हं दिसू लागतात, जी कोलेस्ट्रॉल वाढलं असल्याचा इशारा देतात.

कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?

तज्ज्ञांच्या मते, कोलेस्ट्रॉल ही आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेली मेणासारखी (waxy) वस्तू आहे, जी रक्तवाहिन्यांमधून शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचते. परंतु, जेव्हा कोलेस्ट्रॉल आणि इतर फॅट्स मिळून धमन्यांच्या भिंतींवर थर साचतात, तेव्हा ‘अॅथेरोस्क्लेरोसिस’ नावाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे रक्तप्रवाह अडखळतो आणि हळूहळू हृदयविकार, स्ट्रोक किंवा ब्लॉकेजचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार

  • HDL (चांगले कोलेस्ट्रॉल)
  • LDL (वाईट कोलेस्ट्रॉल)

जेव्हा शरीरात LDL चे प्रमाण वाढतं, तेव्हा त्याची लक्षणं पाय, डोळे आणि जिभेवर स्पष्टपणे दिसू शकतात.

पायांमध्ये दिसणारी लक्षणं:

कोलेस्ट्रॉल वाढल्याने पायांमधील रक्तवाहिन्या अरुंद किंवा ब्लॉक होऊ शकतात. चालताना अचानक पायात वेदना, क्रॅम्प्स, थकवा जाणवणे हे ‘क्लॉडिकेशन’ या स्थितीचे संकेत आहेत. काहींना पायांवर गुळगुळीत, चमकदार त्वचा, केस कमी होणे किंवा नखांचा रंग बदललेला दिसतो. कधी पाय गार वाटतात, तर कधी नखं जाड व वाकडी होतात. ही स्थिती म्हणजे ‘पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD)’ असू शकते.

डोळ्यांतील धोक्याचे संकेत:

डॉ. अडित्य चौटी यांच्या मते, डोळ्यांच्या वर किंवा खाली पिवळसर ठिपके (xanthelasma) दिसू लागले, तर तो शरीरात वाढलेल्या फॅट्सचा पहिला इशारा असू शकतो. हे ठिपके त्वचेसारखे दिसतात; पण ते फॅटी डिपॉझिट्स असतात. काही वेळा डोळ्यांच्या बाहुल्यांभोवती पांढरट किंवा निळसर वलय दिसते याला ‘Arcus Senilis’ म्हणतात. ही स्थिती विशेषतः ३५ वर्षांनंतर वाढत्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण मानली जाते. तसेच, रेटिनल व्हेन ऑक्लुजन किंवा रेटिनल आर्टरी ब्लॉकेज झाल्यास एक डोळ्यांत धूसर दिसणं, काळे ठिपके (floaters) दिसणे किंवा अचानक दिसणं कमी होणं ही लक्षणं गंभीर ठरू शकतात.

जिभेवर दिसणारी चिन्हं:

होय, जीभ ही कोलेस्ट्रॉलचं आरशासारखं प्रतिबिंब दाखवू शकते. डॉ. स्मृती हिंदरिया यांच्या मते, ‘हॅरी टंग’ नावाची स्थिती दिसू शकते, ज्यात जिभेवर छोटे केसांसारखे ठिपके किंवा उठाव दिसतात. जिभेचं टोक जांभळं किंवा निळसर दिसतं, काही वेळा रक्त साचल्यासारखा रंग दिसतो. डॉ. अरोरा सांगतात की, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीराला पुरेसं ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही. त्यामुळे जीभ पिवळसर किंवा निळसर होऊ शकते.

काय कराल?

तज्ज्ञांच्या मते, ही सर्व लक्षणं इतर आजारांमुळेही दिसू शकतात; पण कोलेस्ट्रॉल तपासणी नियमित करणे, संतुलित आहार, व्यायाम व धूम्रपान टाळणे हेच सर्वांत प्रभावी प्रतिबंधक उपाय आहेत. कारण- वाढलेलं कोलेस्ट्रॉल शांतपणे शरीरात नाश करीत राहतं… आणि वेळेवर ओळख न झाल्यास, पुढचं पाऊल हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक असू शकतं.