होळी म्हटलं की रंग हे आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र हे रंग बऱ्याचदा तुमच्या त्वचेचं, केसांचं नुकसान करू शकतात. तुम्ही अगदी ऑरगॅनिक रंग वापरत असलात तरी सूर्यप्रकाशात आणि रंगांच्या पाण्यात तुमचा बराच वेळ जाणार आहे. पण, काळजी करू नका. अशा काही टिप्स आहेत, ज्यामुळे होळीची धमाल केल्यानंतरही तुमच्या त्वचेचा तजेला कायम राहील.

एसपीएफ: एसपीएफ किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या लोशनचे संरक्षण तुमच्या त्वचेला द्या. त्यामुळे त्वचा मॉईश्चराइज होईल आणि सूर्याच्या प्रखर किरणांपासून तिचे संरक्षण होईल. रंग, धूळ आणि उष्णतेचा सामना तुमच्या त्वचेला करावा लागणार आहे. त्यामुळे, यापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. चेहरा, मान, हात आणि रंग लागेल अशा शरीराच्या अन्य सर्व भागांना नीट लोशन लावा.

नारळाचे तेल: नारळाच्या तेलामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि रंग त्वचेत कमी प्रमाणात झिपरतात. शिवाय, त्वचा आणि केसांवर संरक्षक कवच असल्यास रंग धुवून काढणेही सोपे होते. त्वचेला अधिक मॉइश्चराइज करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून लावू शकता.
लिप बाम: ओठांच्या भेगांमध्ये रंग अगदी सहज जातात. चांगल्या दर्जाच्या लिप बामचे ४ ते ५ कोट्स लावून ओठांना नीट घासून घ्या आणि ओठ मऊ व मॉइश्चराइज्ड राहतील, याची काळजी घ्या.

हँड क्रीम: होळीमध्ये सर्वाधिक दुर्लक्ष होतं ते हातांची काळजी घेण्याकडे. नखांमध्ये रंग चटकन अडकून बसतात आणि ते काढणं अगदी अशक्य होऊन जातं. नखांमध्ये रंग अडकू नयेत आणि क्युटिकल्सचे नुकसान होऊ नये यासाठी भरपूर हँड क्रीम लावा. नखं लहानच ठेवा. शिवाय, होळीच्या आधी अॅक्रॅलिक किंवा जेल नेल्सचा वापर टाळा.

शॉवर जेल: शरीरावर लागलेले रंग धुवून काढण्यासाठी कोणत्याही तीव्र साबणाऐवजी नैसर्गिक शॉवर जेलचा वापर करा. अंग घासण्याचा स्पंज किंवा इतर साधनांचा वापर करतानाही जरा जपून.

शॅम्पू: केसांना पूर्णपणे वाचवणे अशक्य आहे. पण, हा त्रास कमी करता येईल. त्यासाठी सौम्य कडिंशनिंग असणारा माइल्ड स्वरुपातील शॅम्पू वापरून केसांमधील मॉइश्चर संरक्षित ठेवा. सारखे केस धुवू नका. त्याऐवजी, केस धुण्यामध्ये काही काळाचे अंतर ठेवा. त्यामुळे, त्वचेतून निर्माण होणारे नैसर्गिक तेल धुवून जाणार नाही आणि केस कोरडे होणार नाहीत.

फेस स्क्रब: मृत त्वचा काढून टाकणे आणि बंद झालेली छिद्रे मोकळी करण्यासाठी होळीनंतर दुसऱ्या दिवशी फेस स्क्रब वापरा. चेहऱ्यावर हळुवारपणे गोलाकार लावा. शरीराच्या इतर भागांवरही स्क्रबचा वापर करता येईल. कोमट पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर त्वचा कोरडी पडू नये यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेस मास्क: होळीमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि इतर घटकांचा तुमच्या त्वचेशी संपर्क होतो. त्यामुळे, त्वचेला आराम देण्यासाठी तुम्ही हर्बल फेस पॅक वापरू शकता. त्वचेवर हळुवार मालिश करा आणि मास्क १० ते १५ मिनिटं राहू द्या. मास्कमुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल, कमी झालेले माइश्चरायझर पुन्हा निर्माण होईल आणि त्वचेची स्वच्छता होईल. एक-दोन वेळ मास्क लावल्यास त्वचा पुन्हा पुर्ववत होत असल्याचे तुम्हाला जाणवेल.