weight loss Tips: आजकाल वजन कमी करण्याच्या चर्चेत सर्वात जास्त ज्या पेयाचे नाव घेतले जाते ते म्हणजे ग्रीन टी. काही लोकांचा असा ठाम विश्वास असतो की दररोज ग्रीन टी प्यायल्याने पोटाची चरबी कमालीची वेगाने कमी होते. इतकेच नव्हे तर काहींना वाटते की ग्रीन टी म्हणजे जादूचा उपाय! पण, खरंच ग्रीन टी इतकी प्रभावी आहे का? ती वजन कमी करण्यात कितपत मदत करते आणि तिचे काही दुष्परिणामदेखील आहेत का?
आपल्यातील अनेकांची सकाळ चहाशिवाय सुरूच होत नाही. काहींना तर दूध चहा मिळाला नाही तर दिवसच उजाडत नाही असे वाटते. मात्र, रिकाम्या पोटी असा चहा घेतल्यास पचनसंस्थेवर घातक परिणाम होऊ शकतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत जंकफूड, रात्री उशिरापर्यंत जागरण आणि व्यायामाचा अभाव, यामुळे पोटाभोवती चरबी साचते. ही वाढलेली चरबी दिसायला वाईट दिसण्याबरोबरच हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढवते.
ग्रीन टीमध्ये काय असते?
ग्रीन टी पारंपरिक चहापासून बनवली जाते, परंतु ती ओलोंग चहाइतकी प्रक्रिया केलेली नसते. त्यात अँटीऑक्सिडंट्स, कॅटेचिन आणि थोड्या प्रमाणात कॅफिन असते. हे घटक शरीरातील सूज कमी करतात आणि मेटाबॉलिझम वाढवतात, ज्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात.
कशी कमी होते चरबी?
ग्रीन टी शरीरातील फॅट ऑक्सिडेशन प्रक्रिया वाढवते, म्हणजेच साचलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरली जाते, ज्यामुळे पोटाची चरबी हळूहळू कमी होते. काही लोकांमध्ये ग्रीन टीमुळे भूकही कमी होते, त्यामुळे वारंवार खाण्याची सवय कमी होते आणि वजन नियंत्रित राहते. मात्र, हे परिणाम तात्काळ दिसत नाहीत; नियमितपणे सेवन केल्यावरच बदल जाणवतात.
ग्रीन टीचे फायदे
१. वजन कमी करण्यास मदत करते
२. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणारे एक नैसर्गिक डिटॉक्स पेय
३. जेवणानंतर घेतल्यास पचन सुधारते
४. थकवा कमी करून एकाग्रता वाढवते
कधी आणि किती घ्यावी?
१. रिकाम्या पोटी घेऊ नका, हलक्या नाश्त्यानंतर घेणे योग्य राहते
२. दुपारचे जेवण झाल्यावर सर्वात योग्य असते
३. दिवसाला २ ते ३ कप पुरेसे
साइड इफेक्ट्स कोणते?
ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने अस्वस्थता, निद्रानाश किंवा कॅफिनमुळे हृदय गती वाढू शकते. काही लोकांना रिकाम्या पोटी ते प्यायल्यास छातीत जळजळ किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.