Nutritional Value Of Eggs : फिट राहण्यासाठी, बुधवार आणि रविवारी चिकन, मटण बनवण्याचा कंटाळा आला तर कधी भाजी काय बनवायची सुचत नसेल तर आपण सगळेच अंडी हा पर्याय निवडतो. अंड्यांना “सुपरफूड” म्हणून ओळखले जाते; यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने, निरोगी चरबी (हेल्दी फॅट्स) आणि आवश्यक जीवनसत्त्वे असतात. प्रत्येक अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी १२, डी आणि ए सारखे पोषक घटक असतात. याचबरोबर कोलीन देखील असते; जे मेंदूला गोष्टी लक्षात ठेवण्यात आधार देतात.

अंड्यांचे आरोग्यदायी फायदे

अंड्यामधील प्रथिने शरीराद्वारे सहजपणे शोषली जातात; ज्यामुळे स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी फायदेही ठरतात. अंडी खाल्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही; ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते. अंड्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटीऑक्सिडंट्स जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास देखील मदत करतात. पूर्वी लोकांना वाटायचे की, अंडी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढते.पण आता संशोधनातून असं दिसून आलं आहे की, अंडी चांगल्या कोलेस्टेरॉलचे (HDL) प्रमाण वाढवायला मदत करतात.

तुम्ही दिवसातून किती अंडी खाल्ली पाहिजेत?

इंडिया टीव्हीने कानपूर येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉक्टर अंजली तिवारी यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, अंडी हा बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक मानला जातो. कारण – त्यात उच्च दर्जाचे प्रथिने, व्हिटॅमिन डी, बी१२ आणि कोलीन भरपूर प्रमाणात असते. पण, या सगळ्यातही संयम हा महत्त्वाचा घटक आहे.

पुढील आजार असलेल्या मंडळींनी घ्यावी विशेष काळजी…

अंडी उकडून, भाजून (बुर्जी) किंवा शिजवून कोणत्याही प्रकारे खाल्ली की चांगलीच लागतात. पण, जर एखाद्याला मधुमेह, हृदयरोग किंवा वाढलेले एलडीएल कोलेस्ट्रॉल असेल तर आठवड्यातून चार किंवा पाच अंडी खाल्ली पाहिजेत. सामान्य कोलेस्टेरॉल पातळी असलेल्या निरोगी व्यक्तीसाठी, दिवसातून एक किंवा दोन अंडी खाणे सुरक्षित आणि स्नायूंच्या दुरुस्तीला, मेंदूच्या कार्याला आणि तृप्ततेला देखील फायदेशीर ठरते.

आपला एकूण आहार सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. जर एखादा व्यक्ती फळं, भाज्या आणि चांगल्या प्रकारचे फॅट्स (healthy fats) खात असेल, तर अंडी त्या आहारात छान बसतात.अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढतो ही भीती आता जवळजवळ चुकीची ठरली आहे. पण तरीही संतुलित आहार ठेवणे आणि अंडी तळण्याऐवजी उकडून किंवा शिजवून खाणे हे शरीरासाठी जास्त चांगले असते.

साधी, स्वस्त आणि पौष्टिक अंडी नैसर्गिक पॉवरहाऊस आहे. चांगले आरोग्य देणारे पदार्थ नेहमीच महागड्या पॅकेजमध्ये येत नाहीत, तर कधी कधी अंड्यासारख्या साध्या कवचातही सापडतात.