Hair Care Tips : शरीराप्रमाणे केसांचीही नियमित स्वच्छता राखणे गरजेचे असते. अनेकांना वाटते की, केस स्वच्छ ठेवणे म्हणजे शॅम्पू लावून धुणे; परंतु असे नाही. केस आठवड्यातून किती वेळा धुतले पाहिजेत हेही आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. (How many times wash hair in a week) अनेक जण रोज केस धुतात; तर काही जण दर दोन दिवसांनी केस धुतात. पण, तज्ज्ञांच्या मते- रोज केस धुतल्याने केसगळतीची समस्या वाढू शकते.
डर्मेटोलॉजिस्टच्या मते- आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?
डर्मेटोलॉजिस्टच्या मते- केसांची स्वच्छता ही तुमच्या लाइफस्टाईलवर अवलंबून असली तरी आठवड्याच्या प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी केस धुतले पाहिजेत. जर एखाद्याला खूप घाम येत असेल, तर नेहमी केस धुवावे लागतील. घाम, धूळ, प्रदूषण यांमुळे केसांची मुळेही कमकुवत होऊन केस गळू शकतात.
केस किती दिवसांनी धुवावेत?
१) केसांना खाज सुटत असेल किंवा टाळूला खाज येत असेल, तर तुम्ही केस दर दुसऱ्या दिवशी धुवू शकता.
२) माइल्ड शॅम्पू वापरत असाल, तर केस वारंवार धुवू शकता.
३) सल्फेट शॅम्पू किंवा हार्ड शॅम्पूने तुम्ही आठवड्यातून फक्त दोन दिवस केस धुवू शकता.
४) केसांमध्ये कोंडा होत असेल तरी तुम्ही वारंवार केस धुतले पाहिजेत.
केस धुताना ‘या’ चुका करू नका
१) हार्ड शॅम्पू वापरणे टाळा
अँटी डँड्रफ किंवा सल्फेट शॅम्पू वापरणे टाळले पाहिजे. त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. अशा प्रकारच्या शॅम्पूच्या सततच्या वापरामुळे केसांमधील नॅचरल ऑइलचे प्रमाण कमी होते. म्हणूनच केस धुण्यासाठी सल्फेट फ्री माइल्ड शॅम्पूचा वापर करावा. त्यामुळे केसांमधील मॉइश्चर टिकून राहते.
२) गरम पाण्याचा वापर करू नका
केस गरम पाण्याने धुवू नयेत, असे केल्याने केस कोरडे व रुक्ष होतात. तसेच केसगळतीची समस्याही वाढते. त्यामुळे गरम पाण्याने केस धुणे टाळावे.
३) केस टॉवेलने रगडून पुसू नका
केस धुतल्यानंतर ते टॉवेलने रगडून पुसू नका, त्यामुळे केस तुटतात. केस नाजूक असल्याने ते पुसण्यासाठी नेहमी मऊ टॉवेल किंवा कपड्याचा वापर करा.
४) उत्तम कंडिशनरचा वापर करा
केसांसाठी कंडिशनर खूप फायदेशीर असते. कंडिशनरच्या वापरामुळे केस फ्रिज फ्री होतात आणि केसांमधील मॉइश्चर टिकून राहते. त्यामुळे केस चमकदार व मऊशार होतात. म्हणूनच केसांसाठी योग्य त्या कंडिशनरचा वापर करा.