अनेकदा स्वयंपाक करताना घाईगडबडीत किंवा अचूक अंदाज न आल्याने भाजीत तेल जास्त होते. यावेळी भाजीच्या रश्श्यामध्ये तेल वर तरंगताना दिसते. त्यामुळे चविष्ट भाजीही चांगली लागत नाही. अशावेळी भाजीची चव न घालवता अतिरिक्त तेल काढायचे कसे असा प्रश्न पडतो. पण, काळजी करू नका; काही घरगुती टिप्स वापरून तुम्ही भाजीतील जास्तीचे तेल काढून टाकू शकता. ते कसे जाणून घेऊ…
भाजीत जास्त झालेले तेल काढण्यासाठी उपाय
१) उकडलेले बटाटे वापरा
उकडलेला बटाटा वापरून तुम्ही एखाद्या भाजीत जास्त झालेले तेल कमी करू शकता. यासाठी उकडलेले बटाटे मोठे तुकडे करून भाजून घ्या. नंतर भाजीत टाका आणि भाजी कढईत न झाकता पाच मिनिटे शिजवा. काही वेळाने बटाटे बाहेर काढून बाजूला ठेवा. यामुळे बटाटा ग्रेव्हीचे अतिरिक्त तेल शोषून घेईल.
२) टोमॅटो प्युरी टाका
भाजीमध्ये जास्त झालेले तेल ग्रेव्हीच्या वर तरंगताना दिसते. जे बघायला चांगले दिसत नाही. अशावेळी भाजीच्या वरचा तेलाचा थर काढून टाकावा. नंतर पॅनमध्ये टोमॅटो प्युरी टाकून एक मिनिट शिजवून भाजीत मिसळा. आता भाजी झाकून न ठेवता दोन मिनिटे मंद आचेवर शिजवा, त्यामुळे भाजीत तेल दिसणार नाही.
३) कॉर्नफ्लोअरचा वापर करा
जर भाजीत जास्त तेल असेल तर तुम्ही त्यात कॉर्नफ्लोअरदेखील वापरू शकता. यासाठी कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी मिसळून पीठ बनवा. नंतर एका पॅनमध्ये दोन मिनिटे मंद आचेवर शिजवा. यानंतर हे द्रावण भाजीमध्ये मिसळा. त्यामुळे भाजीमध्ये असलेले अतिरिक्त तेल दिसणार नाही आणि भाजीची टेस्टही सुधारेल.
४) बेसनाचा करू शकता वापर
भाजीमध्ये जास्तीचे तेल दिसू नये म्हणून तुम्ही बेसनाचाही वापर करू शकता. यासाठी थोडे बेसन कोरडे भाजून भाजीत मिसळावे. त्यामुळे भाजीमध्ये जास्तीचे तेल सापडणार नाही, तसेच ग्रेव्हीमध्ये घट्टपणाही येईल आणि चवही खूप वाढेल.
५) ब्रेडची मदत घ्या
काहीच नाही तर तुम्ही ब्रेडच्या मदतीनेही भाजीतील अतिरिक्त तेल काढू शकता. यासाठी ब्रेड ड्राय रोस्ट करा, नंतर ब्रेड भाजीत अलगद ठेवा आणि एक किंवा दोन मिनिटे तसेच राहू द्या; नंतर तो काढून टाका. अशा प्रकारे ब्रेड अतिरिक्त तेल शोषून घेईल आणि भाजीमध्ये कमी तेल दिसेल.