Kidney Good Foods: आपल्या शरीराची स्वच्छता आणि संतुलन राखण्यासाठी मूत्रपिंड खूप महत्त्वाचे असते. मूत्रपिंडाचे काम म्हणजे रक्त शुद्ध करणे, शरीरातील घातक पदार्थ आणि जास्तीचे पाणी बाहेर काढणे तसेच हार्मोनचे संतुलन राखणे. पण, जर आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष दिले नाही तर हे नाजूक अवयव हळूहळू कमकुवत होऊ लागतात. त्याशिवाय चुकीच्या आहारामुळे मूत्रपिंडात खडेही होऊ शकतात. मात्र, मूत्रपिंडातील खडे ही एकदाच होणारी समस्या नाही. एकदा खडे झाले की ते पुन्हा होण्याची भीती कायम राहते.
हेल्थ एक्स्पर्ट्सच्या मते, मूत्रपिंडातील खड्यांनी त्रस्त रुग्णांना पुढच्या दहा वर्षांत पुन्हा खडे होण्याची ५० टक्क्यांपेक्षा जास्त शक्यता असल्याचे सांगितले आहे. खड्यांमुळे होणारा वेदनादायक अनुभव कोणीही कधी विसरू शकत नाही. त्यामुळे जीवनशैली, आहार आणि पाण्याचे सेवन याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सर्जन आणि यूरोलॉजिस्ट डॉ. नितीन श्रीवास्तव यांनी सांगितले की, मूत्रपिंडातील खडे असलेल्या लोकांनी कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे आणि कसा बचाव करावा.
ऑक्सलेट असलेले पदार्थ
पालक, बीट, शेंगदाणे, बदाम, काजू आणि चॉकलेट यांसारख्या पदार्थांमध्ये ऑक्सलेट जास्त प्रमाणात असते. हे घटक शरीरात गेले की कॅल्शियमसोबत मिसळून मूत्रपिंड किंवा मूत्राशयात कठीण खडे तयार करतात. हे मूत्रपिंडात खडे होण्याचे एक मुख्य कारण आहे. जे लोक असे पदार्थ जास्त खातात त्यांना वारंवार खडे होण्याचा धोका वाढतो, म्हणून अशा पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. त्याऐवजी काकडी, कलिंगड, द्राक्षे, फ्लॉवर यांसारख्या कमी ऑक्सलेट असलेल्या भाज्या आणि फळे खावीत. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातून ऑक्सलेट बाहेर टाकायला मदत होते.
मीठ आणि सोडियम जास्त असलेले पदार्थ
आजकाल प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड आणि फास्ट फूड खाणे खूप वाढले आहे. या सगळ्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. सोडियम जास्त झाल्यावर शरीरातील कॅल्शियम लघवीतून बाहेर पडते. हेच कॅल्शियम मूत्रपिंडात खडे होण्याचे मुख्य कारण आहे, म्हणून पहिला उपाय म्हणजे खारट पदार्थ कमी खाणे. यासाठी ताज्या भाज्या, फळे, घरचे बनवलेले जेवण आणि हलके मसाले वापरणे चांगले.
प्राणिजन्य पदार्थ आणि मांसाहारी आहार
प्राण्यांच्या मांसात प्रोटीनसोबत प्युरिनही जास्त प्रमाणात असते. हे प्युरिन शरीरात गेल्यावर यूरिक अॅसिड वाढवते आणि त्यामुळे यूरिक अॅसिडचे खडे होतात. त्याशिवाय मांसातील प्रोटीनमुळे लघवी जास्त आम्लीय होते, ज्यामुळे खडे होण्याची शक्यता वाढते; म्हणून जास्त मांस खाणे टाळणे गरजेचे आहे. त्याऐवजी डाळी जसे मसूर, हरभरा, सोयाबीन, धान्य आणि भाज्या खाव्यात. यामध्ये शरीराला लागणारे प्रोटीन मिळते आणि मूत्रपिंडालाही त्रास होत नाही.
गोड पेये
साखर फक्त शरीराच्या अनेक अवयवांना हानी पोहोचवत नाही, तर मूत्रपिंडासाठीही तितकेच घातक आहे. गोड कोल्ड ड्रिंक्स, सोडा, पॅकेज्ड ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स यामध्ये फ्रुक्टोज जास्त असते. फ्रुक्टोजमुळे मूत्रपिंडात खडे तयार होण्याची शक्यता वाढते. जे लोक असे ड्रिंक्स वारंवार पितात त्यांना खडे होण्याचा धोका जास्त असतो.
कॅफिन आणि व्हिटॅमिन सीचे जास्त सेवन
कोलामध्ये फॉस्फोरिक अॅसिड असते, जे थेट मूत्रपिंडात खडे तयार होण्याची शक्यता वाढवते. कॅफिनमुळे शरीर डिहायड्रेट होते, लघवीचे प्रमाण कमी होते आणि खडे होण्याचा धोका वाढतो. याशिवाय अनेक लोक व्हिटॅमिन C सप्लिमेंट्स जास्त प्रमाणात घेतात. त्याचे जास्त सेवन केल्याने शरीरात ऑक्सलेट तयार होते आणि त्यामुळे पुन्हा खडे होऊ लागतात.