Kitchen Cleaning Tips: आपण घरातील हॉल, बेडरूम स्वच्छ ठेवतो; परंतु अनेकदा स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे स्वयंपाकघर दिवसेंदिवस आणखी अस्वच्छ होऊ लागते. स्वयंपाकघरातील गॅसच्या अवतीभवती मसाल्याचे, तेलाचे अनेक चिवट पिवळे, काळे डाग दिसू लागतात, जे सहज साफ करणं खूप कठीण असतं. पण, अशा वेळी तुम्ही अजिबात काळजी करू नका… कारण- काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तेल आणि मसाल्याचे हट्टी डागही सहजपणे काढून टाकू शकता.

स्वयंपाकघरातील तेलकट डाग घालवण्यासाठी उपाय

व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याने स्वच्छ करा

तुम्ही तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. प्रथम एका भांड्यात एक कप व्हिनेगर आणि दोन चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत ओता आणि डाग असलेल्या भागावर ते स्प्रे करा. ते १०-१२ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ब्रशने हळुवारपणे घासून घ्या. अशा प्रकारे स्वयंपाकघरातील हट्टी डाग सहजपणे निघून जातील.

लिंबू आणि मीठ वापरा

लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे अगदी हट्टी डागदेखील काढून टाकण्यास मदत करतात. डाग साफ करण्यासाठी प्रथम एक लिंबू कापून, त्यावर मीठ शिंपडा आणि नंतर ते डागावर घासून घ्या. तुम्हाला दिसेल की, काही मिनिटांतच डाग फिकट होऊ लागलाय. आता टाइल्सवरील ती जागा ब्रशने स्वच्छ करा.

डिशवॉश लिक्विड आणि गरम पाणी

अनेकदा गॅसच्या आजूबाजूच्या किचन टाइल्स खूप खराब होतात, ज्या साफ करण्यासाठी तुम्ही डिशवॉश लिक्विड आणि गरम पाण्याचा वापर करू शकता. त्यासाठी एका वाटीत गरम पाणी घेऊन त्याच दोन चमचे डिशवॉश लिक्विड मिक्स करा. या मिश्रणात कपडा बुडवून, तो डाग असलेल्या भागांवर ठेवा. या उपायामुळे डागाशिवाय टाइल्सवरील दुर्गंधही निघून जातो.