Best Way to Clean Mixer Grinder at Home: स्वयंपाकघरात मिक्सर ग्राइंडर नसलेलं घर शोधणं आज जवळपास अशक्य आहे. चटणी, मसाले, शेक, ज्यूस हे सगळं काही मिनिटांत तयार करून आपलं जीवन सोपं करणारं हे उपकरण आपल्याला रोज मदत करतं. पण, खरी कसरत तेव्हा सुरू होते, जेव्हा या ग्राइंडरवर चटणी, मसाल्यांचे हट्टी डाग बसतात. तेलकटपणा आणि कधीही न निघणारे डाग पाहून वाटतं, आता हा मिक्सर फेकूनच द्यावा का? साबणाने धुतले तरीही निघत नाहीत आणि संपूर्ण स्वच्छतेचं काम जिकिरीचं होतं. मग काय कराल? काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ‘असे’ ५ जबरदस्त घरगुती उपाय, ज्यामुळे तुमचा मिक्सर ग्राइंडर काही मिनिटांत पुन्हा नव्यासारखा चमकू लागेल.

‘हे’ ५ देशी उपाय करा आणि मिक्सरला द्या नवी झळाळी

१. सिरका आणि पाणी

मिक्सरच्या बाहेर चिकटलेला चिकट मळ स्वच्छ करायचा असेल तर पाण्यात थोडा सिरका (vinegar) आणि डिशवॉश लिक्विड मिसळा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ग्राइंडरवर फवारणी करा. १० मिनिटं तसंच ठेवा आणि नंतर कापडाने पुसा. पाहता पाहता जुन्या डागांचं नामोनिशाणही नाहीसं होईल.

२. टूथपेस्ट आणि इयरबड

ग्राइंडरच्या झाकणाखालील बारीक कपारीत धूळ जमा होते, त्यासाठी इयरबडवर थोडा साबण किंवा सिरका लावून साफ करा. जारच्या आतल्या भागातील कठीण डागांसाठी टूथपेस्ट वापरा. जुना टूथब्रश घ्या, त्यावर टूथपेस्ट लावा आणि रगडा. बघता बघता जार होईल पुन्हा टवटवीत.

३. बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा घरातील सर्वात चांगला क्लिनिंग एजंट आहे. थोड्या पाण्यात किंवा लिंबाच्या रसात सोडा मिसळून पेस्ट तयार करा. मिक्सरवर लावा आणि १५ मिनिटं वाट पाहा. नंतर कोरड्या कपड्याने पुसा. डाग गायब होतीलच, पण जुनाट वासदेखील नाहीसा होईल.

४. लिंबाचे साल

स्वयंपाकघरात नेहमीच मिळणारं लिंबू ही या कामाची रामबाण की आहे. लिंबाची साले घेऊन ग्राइंडरवर चोळा. १५ मिनिटांनी ओलसर कापडाने पुसा. चिकट डाग आणि सडका वास दोन्ही झटक्यात नाहीसे होतील.

५. रबिंग अल्कोहोल

जर सगळे उपाय करूनही डाग हट्टाने बसले असतील, तर शेवटचा उपाय म्हणजे रबिंग अल्कोहोल. थोडं स्पंजवर घ्या आणि ग्राइंडरवर चोळा. ५ मिनिटं तसंच ठेवा आणि पुसा. अगदी जुने डागसुद्धा पळून जातील.