How to grow mogra plant: घरात नैसर्गिक सुगंध आणि हिरवळ वाढवण्यासाठी मोगऱ्याचे रोप एक उत्तम पर्याय आहे. मोगरा केवळ मनमोहक फुलांसाठीच नव्हे तर त्याच्या गोड सुगंधासाठीही ओळखला जातो. घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात मोगऱ्याचे रोप लावल्यास संपूर्ण परिसरात त्या गोड वासाचा अनुभव येतो. तसेच, घराची शोभा वाढवण्यासही मोगरा मदत करतात. जर तुम्हालाही घरात सुगंधी वातावरण आणि ताजेपणा हवा असेल तर मोगरा लावणे फायदेशीर ठरू शकते.
मोगऱ्याचे रोप कसे लावावे?
मोगरा लावण्यासाठी प्रथम योग्य कुंडी निवडणे महत्त्वाचे आहे. १२-१५ इंच खोलीची कुंडी मोगऱ्यासाठी योग्य राहील. कुंडीच्या तळाला पाणी बाहेर जाण्यासाठी एक छिद्र करून घ्या. मोगऱ्याच्या रोपासाठी हलकी आणि सुपीक माती सर्वोत्तम असते. मातीमध्ये थोडी वाळु आणि सेंद्रिय खत मिसळल्यास रोपाला चांगले पोषण मिळते.
कुंडीत रोप लावताना प्रथम २-३ इंच माती ठेवून छोटा खड्डा तयार करा. नंतर मोगऱ्याचे रोप काढून त्याची मुळे खड्ड्यात नीट ठेवा आणि मातीने चारही बाजू भरा. माती भरल्यानंतर हलक्या हाताने थोडे दाबून रोप स्थिर करा. या प्रक्रियेनंतर कुंडीत पाणी द्यावे, परंतु पाण्याचा साठा होऊ देऊ नका.
मोगऱ्याच्या रोपाची काळजी कशी घ्यावी?
रोप लावल्यानंतर कुंडीला सकाळच्या उन्हात ठेवा. मोगऱ्याला सतत सूर्यप्रकाशाची गरज असते. आठवड्यात दोन ते तीन वेळा पाणी पुरवणे पुरेसे ठरते. रोपाला योग्य प्रमाणात पोषण मिळावे यासाठी दर २-३ महिन्यांनी जैविक खत किंवा कंपोस्ट मातीमध्ये घालावे. तसेच, मोगऱ्याच्या फुलांवर नजर ठेवून कोरडे किंवा खराब झालेली फुलं काढून टाकल्यास रोप अधिक चांगले फुलते.
मोगरा लावताना आणि त्याची योग्य काळजी घेतल्यास घरात नेहमीच ताजेपणा आणि गोड सुगंध राहतो. घराच्या बाल्कनीत, टेरेसवर किंवा अंगणात मोगरा लावल्याने घराच्या सौंदर्यात भर पडते आणि मन प्रसन्न ठेवणारे वातावरण तयार होते. त्यामुळे जर तुम्हाला ही घरात हिरवळ आणि सुगंध पाहिजे असल्यास , मोगऱ्याचे रोप नक्की लावा.