Grow Mosambi At Home: आजच्या धावपळीच्या आयुष्यातही अनेकांना झाडं लावणं, त्यांना जपणं आवडतं. अनेक जण आपल्या घराच्या बागेत किंवा बाल्कनीत फुलझाडे, भाज्या आणि औषधी वनस्पती उगवतात. आता या ट्रेंडमध्ये फळझाडांची लागवडही वेगाने वाढत आहे. अशातच मोसंबीचे झाड हे घराच्या बागेसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. सहज उपलब्ध होणारे हे झाड कुंडीमध्येही लावता येते आणि योग्य काळजी घेतल्यास कमी वेळात फळेही देते. फक्त झाड लावणे पुरेसे नाही; त्यासाठी योग्य माती, पाणी आणि सूर्यप्रकाशाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर पाहूया, घराच्या बागेत किंवा बाल्कनीत मोसंबीचे झाड कसे लावावे आणि त्याची योग्य काळजी कशी घ्यावी.
१. योग्य कुंडी निवडा
मोसंबीचे झाड लावण्यासाठी मोठी आणि मजबूत कुंडी आवश्यक आहे. साधारण १६ ते १८ इंचाची कुंडी यासाठी उत्तम ठरते. कुंडी निवडल्यानंतर त्यात योग्य प्रमाणात मातीचे मिश्रण घालणे महत्त्वाचे आहे. सामान्य माती, वाळू आणि शेणखत हे तिन्ही समान प्रमाणात मिसळून कुंडीमध्ये भरावे. हे मिश्रण झाडाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.
२. बीज लावावे की रोप आणावे?
मोसंबीचे झाड तुम्ही बियाण्यांपासून तयार करू शकता. मात्र, बियाण्यांपासून झाड उगवण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे सोयीसाठी नर्सरीतून रोप आणणे उत्तम. नर्सरीतून आणलेले झाड कुंडीत लावून योग्य प्रमाणात पाणी दिल्यास ते सहज वाढू लागते.
३. झाडाची काळजी कशी घ्यावी?
मोसंबीच्या झाडाला थोड्या प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज असते. कुंडी अशा जागी ठेवा, जिथे दररोज किमान ५ ते ६ तास सूर्यप्रकाश येतो. झाडाला वेळोवेळी पाणी द्यावे. मात्र, पाणी देताना कुंडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी साचणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे झाडाची मुळे कुजतात. वेळोवेळी सेंद्रिय खते टाकल्यास झाड अधिक निरोगी राहते.
आजच्या काळात जागेअभावी अनेकांना मोठ्या बागा सांभाळता येत नाहीत. पण, बागेत किंवा बाल्कनीत मोसंबीचे झाड लावून तुम्ही घरबसल्या ताज्या फळांचा आनंद घेऊ शकता. हे झाड केवळ फळे देत नाही, तर घराचे सौंदर्यही वाढवते. योग्य कुंडी, माती, सूर्यप्रकाश आणि थोडी काळजी एवढेच घटक पुरेसे आहेत. त्यामुळे तुम्हीही आपल्या होम गार्डनमध्ये मोसंबीचे झाड लावा आणि आरोग्यदायी तसेच स्वादिष्ट फळांचा आस्वाद घ्या.