How to grow rose plants: गुलाबाचे फूल प्रत्येकाला आवडते. गुलाबाचा सुगंध आणि घराच्या बागेत रंगतदार वातावरण निर्माण करणारी ही फुलं घराच्या सौंदर्यात भर टाकतात. अनेकदा आपण बाजारातून गुलाबाचे रोप विकत आणतो; पण गुलाबाची फांदी वापरून नवीन रोप तयार करणे अधिक सोपे आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. फक्त योग्य महिन्यात आणि योग्य पद्धतीने फांदी कापून, आपण घराच्या बागेत सहजगत्या गुलाबाचे रोप उगवून, त्याची जतणूक करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया गुलाबाच्या फांदीद्वारे रोपलागवड कशी करावी ते…

गुलाबाची फांदी लावण्याचा योग्य काळ

गुलाबाची फांदी लावण्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. तथापि, ऑक्टोबरपासून फेब्रुवारी-मार्चपर्यंतही फांदी लावता येते. खूप जास्त थंड किंवा उष्णतेत फांदी लावल्यास रोपट्याची वाढ योग्य रीतीने होत नाही आणि फांदी लवकर खराब होऊ शकते.

गुलाबाची फांदी कापून रोप लागवडीची योग्य पद्धत

१ . गुलाबाच्या फांदीची योग्य निवड

नवीन रोप उगवण्यासाठी योग्य फांदी निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फांदी पूर्णपणे नरम नसावी आणि पूर्णपणे कडकही नसावी. म्हणजेच फांदी अर्ध-परिपक्व असावी. साधारणपणे फांदीची जाडी ६ ते १० मिमीदरम्यान असावी.

२. फांदी कापणे

फांदीचे टोक ४५ अंशाच्या कोनात कापून टाका. ती फांदी लगेच मातीमध्ये लावू नका. कापलेली फांदी थोडा वेळ सूर्यप्रकाशात सुकण्यासाठी ठेवा, नाही तर कीटकांचा धोका निर्माण होऊ शकतो. रोपाची जलद गतीने वाढ व्हावी यासाठी फांदी काही दिवस पाण्यात ठेवता येईल. मग लवकरच त्यावर मुळे आल्याचे दिसेल. त्यानंतर ती फांदी मातीमध्ये लावता येईल.

३. मातीची योग्य पूर्वतयारी

फांदी लावण्यासाठी मातीची योग्य तयारी करणे गरजेचे आहे. मातीत पाणी साचता नये आणि मुळे कुजता कामा नयेत. त्या मातीत ५०% नारळ आणि ५०% गांडूळखत किंवा शेणखत मिसळा. रोप लावण्यापूर्वी माती एक दिवस सूर्यप्रकाशात ठेवा आणि नंतर ती कुंडीत लावा. पूर्वतयारी करून कुंडीत भरलेल्या मातीमध्ये फांदी व्यवस्थित लावा.

गुलाबाची फांदी वापरून रोप लावल्यास तुमच्या घरची बाग तुम्हाला सुंदर आणि सुगंधी गुलाबांनी फुलल्याचा आनंद तुम्हाला सहजगत्या मिळेल. योग्य काळात आणि योग्य त्या पद्धतीने फांदी लावल्यास रोपाची वाढ जलद गतीने होऊन, ते व्यवस्थित टिकेल. मग तुम्ही स्वतःच्या बागेत दररोज अनेक नवीन गुलाब फुलल्याचा आनंद अनुभवू शकता.