How to identify pure ghee: भारतीय स्वयंपाकघरात तुपाला केवळ स्वादासाठी नाही, तर आरोग्यदायी गुणांसाठीही विशेष स्थान आहे. पण, आजकाल बाजारात अनेकदा नकली किंवा भेसळयुक्त तूप विकलं जातं, ज्यामुळे तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे आपण वापरत असलेलं तूप खरंच शुद्ध आहे का हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुपाची खरी ओळख सुगंध, रंग आणि त्याचा पोत कसा आहे यावरून करता येते. खाली दिलेल्या काही सोप्या घरगुती चाचण्यांनी तुम्हीही शुद्ध आणि भेसळयुक्त तुपातील फरक ओळखू शकता.

१. स्पर्श किंवा सुगंधाद्वारे ओळखा

शुद्ध तुपाचे तापमान कमी असल्यामुळे ते लगेच वितळतं आणि एक हलका गोडसर सुगंध सोडतं. ते हातावर चिकट किंवा जड वाटत असेल, तर त्यात नक्कीच भेसळ आहे, असे समजा. गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप हलकं पिवळसर असतं, तर म्हशीच्या दुधाचं तूप थोडं पांढरं दिसतं. सुगंध आणि रंग हे दोन्ही शुद्धतेचे महत्त्वाचे निर्देशक आहेत.

२. फ्रिज चाचणी

जर तुम्हाला शंका आली की तूप शुद्ध नाही, तर ते तीन ते चार तास फ्रिजमध्ये ठेवा. खरं तूप एकसारखं घट्ट होतं, तर भेसळयुक्त तूप थरांमध्ये विभागलं जातं वर वेगळं आणि खाली वेगळं. ही चाचणी अतिशय सोपी आणि खात्रीशीर आहे, जी घरच्या घरी कोणतीही व्यक्ती करू शकते.

३. पाण्यातली चाचीण

एक चमचा तूप घ्या आणि ते स्वच्छ पाण्यात टाका. जर तूप वर तरंगलं, तर ते शुद्ध आहे; पण जर ते पाण्याच्या तळाशी बसलं, तर त्यात भेसळ आहे. या चाचणीने तुम्हाला लगेच अंदाज येईल की, तुमचं तूप खरंच नैसर्गिक आहे की नाही ते.

४ . भेसळयुक्त तुपाचे दुष्परिणाम

नकली किंवा भेसळयुक्त तूप आरोग्यासाठी घातक असतं. त्यात वापरलेले कृत्रिम घटक आणि रसायनं पचनशक्ती कमी करतात, यकृतावर ताण आणतात, कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि हृदयविकाराचा धोका निर्माण करतात. म्हणून तूप निवडताना नेहमीच खबरदारी घ्यावी.

५ . शुद्ध तुपाचे फायदे आणि घरगुती तयारी

शुद्ध तूप केवळ अन्नाचा स्वादच वाढवत नाही, तर शरीरालाही बळकट करतं. आयुर्वेदात तुपाला ‘सुपोषक अन्न’, असं म्हटलं गेलं आहे. त्यात ए, डी, ई व के ही व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात, जृी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात.

तुपातील शुद्धता टिकवायची असल्यास घरचं तूप बनवणं हा सर्वोत्तम उपाय आहे. रोज दूध उकळल्यानंतर त्यावर येणारी साय गोळा करा आणि काही दिवसांनी ती मंद आचेवर उकळा. हळूहळू ती सुवर्णरंगी होत जाईल आणि मधुर सुगंध पसरवेल, जे आहे खरंखुरं घरगुती तूप. थंड झाल्यावर ते गाळून, स्वच्छ काचेच्या बाटलीत साठवा. असं तूप पूर्णपणे शुद्ध, सुगंधी आणि पौष्टिक असतं.

साठवण आणि सेवनाची काळजी

तूप नेहमी काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात आणि ओलावा व थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.तूप योग्य तापमानात ठेवल्यास ते अनेक महिने ताजं राहतं. दररोज थोड्याशा शुद्ध तुपाचं सेवन केल्यानं पचनशक्ती सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते, पोट स्वच्छ राहतं आणि त्वचेला तेज प्राप्त होतं. पण, तुपाचं योग्य प्रमाणात सेवन करणं आवश्यक आहे. कारण- तरच तुपाचे सर्व गुण शरीरासाठी लाभदायक ठरतात.