सोशल मीडीयाचा वाढता वापर आणि त्यामध्येही फेसबुकसारख्या माध्यमाचा वापर मागच्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे दिसते. कधी स्वत:ला व्यक्त करण्यासाठी तर कधी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींची माहिती जाहीर करण्यासाठी या माध्यमाचा वापर होताना दिसतो. अनेक जणांशी एकाचवेळी कनेक्ट राहणे आपल्याला रोजच्या धावपळीत अनेकदा शक्य होत नाही. पण फेसबुकसारख्या माध्यमातून आता ते अगदी सोपे झाले आहे. सध्या फेसबुकसारख्या माध्यमांकडे नोकरीच्या ठिकाणी तुमची नियुक्ती करताना किंवा तुमची सार्वजनिक प्रतिमा तपासण्यासाठीही पाहिले जाते. जग जवळ आल्याने अगदी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुम्ही कनेक्ट राहू शकता. याला वयाचेही बंधन नाही. जगाच्या वेगाने पुढे जात असताना आपणही अपडेट असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

नुकतीच जगभरात फेसबुकवरील असंख्य खाती बनावट असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बनावट खात्यांची समोर आलेली संख्या खरी असल्याचे फेसबुकने स्वतःही कबूल केले आहे. सध्या फेसबुकचे २०७ कोटी यूजर्स असण्याची शक्यता आहे. त्यातील जवळपास २७ कोटी बनावट असण्याची शक्यता काही दिवसांपूर्वीच वर्तविण्यात आली होती. त्यामुळे वेळीच योग्य ती काळजी घ्यायलाच हवी. आपण वापरत सोशल नेटवर्किंग साईटची सुरक्षितता तपासणे आवश्यक असते. फेसबुकचे असेही काही फिचर्स आहेत जे सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे तर आहेतच पण ते आपल्याला माहित असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या अनोख्या फिचर्सविषयी जाणून घेऊया…

असा ठेवा प्रोफाईल फोटो सुरक्षित

प्रोफाईल फोटो बदलणे हे अनेकांसाठी अगदी आवडीचे काम असते. त्यातही मुलींमध्ये या गोष्टीची क्रेझ जास्त असल्याचे दिसून येते. पण तुमचा प्रोफाईल फोटो कोणीही डाऊनलोड करु शकतो हे आपल्यातील अनेकांना माहितच नसते. पण अशाप्रकारे आपला फोटो कोणीही डाऊनलोड करु नये त्यासाठी फेसबुकने विशिष्ट सेटींग उपलब्ध करुन दिले आहे. काय आहेत त्याचे टप्पे पाहूया
* प्रोफाईल फोटोवर क्लिक करा
* याठिकाणी टर्न ऑन प्रोफाईल पिक्चर गार्ड हा पर्याय दिसेल
* त्यावर क्लिक करुन तो ऑन केल्यास तुमचा फोटो सुरक्षित राहील. विशेष म्हणजे यामुळे तुमचा फोटो कोणीही डाऊनलोड करु शकणार नाही.

अनफ्रेंड केल्याचे कसे ओळखाल?

आता ही गोष्ट आपल्याला सहज समजू शकत नाही. मात्र त्यासाठीही पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला कोणी अनफ्रेंड केले आहे हे ओळखण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. who unfriended me असं या अॅप्लिकेशनचं नाव आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला कोणी अनफ्रेंड केले ते तुम्हाला अगदी सहज आणि कमीत कमी वेळात समजू शकेल.

कमेंट्स, टॅगिंग कशा डिलीट कराव्यात 

आपण कधीतरी गडबडीत एखाद्या पोस्टवर कमेंट करतो. मात्र अशाप्रकारे कमेंट करायला नको होते असे तुम्हाला नंतर वाटते. त्यावर ही कमेंट डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला प्रोफाईलमध्ये जाऊन Activity log मध्ये जावे लागेल. त्यात फिल्टर असा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास लाईक किंवा कमेंट्स असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला डिलीटचा पर्याय उपलब्ध होईल.