Make a Rose Patel face pack: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसावा, असं वाटतं म्हणून अनेक जण विविध ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम, सीरम, लोशन किंवा फेसवॉश यांमुळे खरं तर चेहऱ्यात तात्पुरता बदल होतो. मात्र, त्यामध्ये वापरले जाणारे रसायनयुक्त घटक त्वचेवर दीर्घकाळ परिणाम करतात आणि अनेक वेळा त्वचेला हानीदेखील पोहोचवतात. त्यामुळे नैसर्गिक उपायांकडे वळणं हाच उत्तम पर्याय ठरतो. अशा नैसर्गिक पर्यायांमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा फेस पॅक हा एक अतिशय प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहे.

गुलाब हे सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. सुगंध, रंग व कोमलता या गुणांमुळे गुलाब नेहमीच विशेष ठरतो. पण, त्याच्या पाकळ्या फक्त शोभेसाठी किंवा सुगंधासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीही फार उपयुक्त असतात. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल व अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे गुण त्वचेची सखोल स्वच्छता करून, तिला ताजंतवानं ठेवतात. त्यांचा नियमित वापर केल्यास, त्वचेला नवा उत्साह मिळतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज दिसून येतं.

गुलाबाच्या पाकळ्यांचा फेस पॅक कसा तयार करायचा?

फेस पॅक तयार करण्यासाठी सगळ्यात आधी गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. त्यानंतर या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. या मिश्रणात एक चमचा दही व अर्धा चमचा मध घालावा. दही त्वचेतील कोरडेपणा कमी करतं; तर मध त्वचेला मऊसरपणा देतो. त्यात इच्छेनुसार काही थेंब गुलाबजलही घालता येईल. हे सगळं नीट मिसळून एकसंध पेस्ट तयार करावी. त्याचं स्वरूप सौम्य गुलाबी आणि सुगंधी पेस्टसारखं होतं.

चेहऱ्यावर फेस पॅक कसा लावायचा?

सगळ्यात आधी चेहरा साध्या पाण्यानं धुऊन घ्यावा. नंतर टॉवेलनं तो हलकेच पुसल्यानंतर तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेला समान प्रमाणात लावा. डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग टाळावा. हा पॅक लावल्यानंतर १० ते १५ मिनिटं तसेच ठेवावा. पॅक सुकल्यावर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. चेहरा धुतल्यानंतर त्वचा अधिक ताजीतवानी, स्वच्छ व नाजूक वाटते.

गुलाबाच्या पाकळ्यांचा फेस पॅक लावल्याचे फायदे

  • चेहऱ्यावर नैसर्गिक उजळता आणि चमकदारपणा येतो.
  • त्वचेतील उष्णता कमी करून थंडावा मिळतो.
  • चेहरा तेजस्वी आणि मऊ होतो. चेहऱ्यावरची कोरडेपणा कमी होतो.
  • त्वचा मऊ, तजेलदार आणि आरोग्यदायी राहते.
  • रोजच्या धूळ, प्रदूषणामुळे जमणारी घाण त्वचेतून दूर होते.

गुलाबाच्या पाकळ्यांचा फेस पॅक हा पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक असल्याने त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. रसायनमुक्त उपाय शोधणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. सौंदर्य टिकवण्यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरण्याची गरज नाही. आपल्या घरात सहज मिळणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्या वापरून आपण चेहऱ्यावर दीर्घकाळ टिकणारा नैसर्गिक तेज आणू शकतो.