Shinrin yoku Japanese Therapy : सतत वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण आता जगतोय. त्यामुळे रोज तेच काम, तेच वातावरण, तोच प्रवास करून खूप थकायला होते. यात घरी आल्यानंतरही ऑफिसच्या कामाचे प्रेशर, तर दुसरीकडे घरच्या समस्या या असतातच. या सर्व गोष्टींमध्ये माणूस शरीर आणि मनानेही थकून जातो. ज्यामुळे त्याला अनेकदा मानसिक नैराश्य, चिंता, तणाव आणि शारीरिक आजारांचा सामना करावा लागतो. परंतु, या रोजच्या त्रासापासून थोडे दूर राहत तुम्ही सुट्टीच्या दिवसात एक प्राचीन जपानी थेरपी फॉलो करू शकता. यामुळे तु्म्हाला ऑफिसमधील कामाचा ताण, मानसिक नैराश्य, चिंता अशा अनेक समस्यांपासून दूर राहता येऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला रोज आनंदी, मोकळ्या वातावरण जगल्याचा अनुभव येईल.

‘शिनरीन योकू’ थेरपी म्हणजे काय?

निसर्गात राहून तु्म्हाला ही प्राचीन जपानी थेरपी करायची असते. या थेरपीला जपानी भाषेत ‘शिनरीन योकू’ असे म्हणतात, तर ती ‘फॉरेस्ट बाथिंग’ या नावाने सर्वत्र प्रचलित आहे. यात निसर्गातील वातावरणात स्वतःला एकरुप करत शारीरिक, मानसिक आणि भावनिक आजार दूर करता येतात. यामुळे ‘शिनरीन योकू’ या उपचारात्मक थेरपीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.

या थेरपीत तु्म्हाला जंगलात चालणे, बसणे, उभे राहणे किंवा मोकळा श्वास घेणे अशा गोष्टी करायच्या असतात. यामुळे तुम्ही डोक्यातील अनेक गोष्टी विसरून केवळ निसर्गातील गोष्टींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करता; यामुळे याला फॉरेस्ट थेरपी असेही म्हणतात. याचा अर्थ जंगलातील वातावरणाचा सर्वार्थाने आनंद घेणे.

१९८० च्या सुमारास जपानमध्ये उदयास आलेली ही थेरपी आहे. ज्यात लोकांना जंगलातील दृश्ये, आवाज आणि सुगंध यात पूर्णपणे गुंतवून ठेवण्यास प्रोत्साहित केले जाते. यामध्ये निसर्गरम्य ठिकाणी चालणे, ध्यान करणे आणि काही काळ वास्तव्य करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. ज्यामुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यात चांगले बदत होतात. निसर्गात वेळ घालवताना मनात सुरू असलेली घुसमट, विचार कमी करण्यास मदत होते.

जपानी शिनरीन योकू थेरपी खरंच फायदेशीर आहे का?

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे जनरल फिजिशियन आणि संस्थापक-संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी सांगितले की, निसर्गरम्य वातावरणात राहिल्याने थोडे रिलॅक्स वाटते, तणाव कमी होतो, मूड सुधारतो. निसर्गामुळे मानसिक आरोग्यातही अनेक चांगले बदल होतात. निसर्गातील अनेक गोष्टी आपण आत्मसात करतो. चिंता, नैराश्य काहीवेळ विसरून जातो.

त्यामुळे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात शिनरीन योकू तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी एक शक्तिशाली उपचार पद्धती म्हणून उदयास आले आहे. शांतता आणि उपस्थितीची भावना वाढवते, व्यक्तीला अनेक भौतिक गोष्टींपासून दूर राहता येते. जंगलातील शांततेत हरवून एखादी व्यक्ती मानसिक आरोग्य सुधारू शकते.

अभ्यासाचा तणाव कमी करता येतो, चांगली झोप लागते आणि कामात लक्ष केंद्रित करता येते; याशिवाय तुम्हाला बर्नआउटसाठीहीदेखील ही थेरपी फायदेशीर असते. यामुळे तुम्ही रोज नियमित काही वेळ निसर्गाच्या सान्निध्यात राहिलात, फिरलात तर तुम्हाला मानसिक तणाव, आजार आणि शारीरिक आजारांपासून दूर राहता येते, असे डॉ. बजाज म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोजच्या जीवनात शिनरीन योकू थेरपी कशी करायची?

प्रत्येकाला रोज घनदाट जंगलात जाऊन शिनरीन योकू थेरपी फॉलो करता येणार नाही. यामुळे ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी जवळील उद्यान, शांत बाग, गार्डनमध्ये जाऊन शिनरीन योकू थेरपी करू शकता; ज्यामुळे तुम्हालाही शारीरिक, मानसिक आजारांपासून दूर राहून आयुष्यात आनंदी, शांत आणि टेन्शन फ्री जगता येईल. शिनरीन योकूला ही फक्त एक थेरपी नाही तर निरोगी आरोग्य आणि समतोल, समृद्ध जीवनाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.