Momos Recipe : आजच्या तरुणाईला आणि मुलांना जर विचारलं की, त्यांना सर्वांत आवडतं स्नॅक्स कोणतं, तर बहुतेक जणांचं उत्तर असेल – मोमोज! स्ट्रीटफूडच्या गाड्यांपासून ते रेस्टॉरंटपर्यंत, प्रत्येक ठिकाणी मोमोज सहज मिळतात. स्टीम्ड, फ्राईड किंवा तंदुरी अशा वेगवेगळ्या व्हरायटीमधील मोमोज खूप लोकप्रिय झाले आहेत. परंतु, एक गोष्ट मात्र अनेकांना खटकते आणि ती म्हणजे मोमोज प्रामुख्याने मैद्यापासून तयार केले जातात. अनेकांना मैदा पचत नाही, तर काही जण आरोग्याच्या कारणामुळे तो खाणे टाळतात. अशा वेळी पर्याय काय?
याच प्रश्नाचे उत्तर म्हणजे गव्हाच्या पिठाचे मोमोज! आता तुम्ही आवडते मोमोज मैद्याशिवायही खाऊ शकता. गव्हाचे पीठ, थोडे तांदळाचे पीठ आणि पौष्टिक भाज्या वापरून बनवलेले हे मोमोज केवळ स्वादिष्टच नाहीत, तर आरोग्यदायीही ठरतात. आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
- मोमोजसाठी लागणारी साहित्य
१ कप गव्हाचे पीठ
अर्धा कप तांदळाचे पीठ
बारीक चिरलेली पत्ता कोबी
गाजर
१ कांदा
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
हिरवी मिरची
१ चमचा सोया सॉस
मीठ चवीनुसार
पाणी
१ मोठा चमचा तेल
- कसे तयार कराल गव्हाच्या पिठाचे मोमोज?
स्टेप १ : पीठ मळून घ्या
सर्वप्रथम गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ एका भांड्यात घ्या. त्यात चिमूटभर मीठ आणि थोडं पाणी टाकून मऊसर, पण घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ फार घट्ट किंवा फार सैल होणार नाही याची काळजी घ्या.
स्टेप २ : सारण तयार करा
एका कढईत थोडं तेल गरम करून, त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची व बारीक चिरलेला कांदा टाका. आता हे सर्व थोडं परतून घ्या. त्यानंतर गाजर आणि पत्ता कोबी घाला. भाज्या थोड्या क्रंची राहतील इतपत परतून घ्या. त्यात सोया सॉस, मीठ व थोडी मिरीपूड घालून सगळं मिश्रण चांगलं हलवून गॅस बंद करा.
स्टेप ३ : मोमोज बनवा
आता मळलेल्या पिठाच्या लहान लहान गोळे करा. प्रत्येक गोळा पुरीसारखा लाटून घ्या. त्याच्या मध्यभागी फिलिंग ठेवा. किनारीला नीट दाबून मोमोजचा आकार द्या.
स्टेप ४ : मोमोज स्टीम करा
मोमोज स्टीमरमध्ये ठेवा आणि साधारण १०-१५ मिनिटे वाफवून घ्या. मोमोज शिजल्यावर त्यांचा रंग किंचित बदलतो. आता ते गरमागरम लाल टोमॅटो-लसूण चटणीसह सर्व्ह करा.