How to keep snake away from home: सापाचं नाव काढलं तरी अनेकांना घाम फुटतो. साप दिसल्यावर त्यांचं काय होईल याचा अंदाज लावा. सापाची हालचाल अशी असते की, सामान्यांना त्याची भीती वाटते. काही सापांच्या चाव्याने एका दंशात माणसाचा मृत्यू होऊ शकतो. पावसाळा आला की, अनेकदा कीटक किंवा साप बाहेर येतात. त्यात अनेक विषारी सापांचाही समावेश आहे. साप बिळात राहत असले तरी पावसाळ्यात ते बाहेरही फिरताना दिसतात. पावसाळ्यात तर हे साप अनेकदा घरातही शिरतात. साप पाहिल्यानंतर भीती वाटणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. पण, आपल्या घरात जर साप निघला तर जास्तच भीती वाटते. साप म्हटलं की भीती आणि गोंधळ स्वाभाविक आहे. पण, अशी वेळ आलीच तर घाबरून न जाता योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. घरात साप दिसला तर काय करायचं? यावर इंडियन पेस्ट कंट्रोलचे दीपक शर्मा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे. त्यासंबंधी सविस्तर जाणून घेऊ..
सापांपासून घर सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?
प्रकाश ठेवा : साप बहुतेक वेळा संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. त्यामुळे बागेत किंवा घराच्या मुख्य प्रवेशाजवळ प्रकाश ठेवणे महत्त्वाचे आहे.
दरवाज्याखालची फट बंद करा: दरवाज्याखाली फट असेल तर ती फट बंद करा. भिंतींमधले भेग, किंवा उघडी नळी या सील करा.
आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा: साप झाडाझुडपांत, लाकडाच्या ढिगात, प्लास्टिकच्या डब्यांखाली किंवा कुजलेल्या पानांत लपतात त्यामुळे आपण जर परिसर नियमित स्वच्छ ठेवला, झाडाझुडपी छाटली आणि ओलसर अंधाऱ्या जागा टाळल्या, तर साप त्या परिसरात टिकत नाहीत.
घराच्या कोपऱ्यांवर लक्ष ठेवा: इलेक्ट्रिक मीटर बॉक्स, इन्व्हर्टरजवळचा भाग, ड्रेनेज आउटलेट्स हे सर्व साप लपण्यासाठी उपयुक्त जागा असतात. त्याचप्रमाणे साप गटारातून किंवा ड्रेनेज पाइप्समधून घरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे गटाराचे झाकण कायम बंद ठेवा. घराच्या कोपऱ्यांवर लक्ष ठेवा.
साप दिसला तर काय कराल?
- शांत राहा, हालचाल टाळा.
- सर्पमित्रांना तात्काळ कॉल करा.
- अंधाऱ्या भागात अनवाणी न जाता आधी पाहणी करा.
- बूट, कपडे वापरण्यापूर्वी झटकून पाहा.
साप दिसला तर असं करू नका :
- केरोसिन, डिझेल ओतू नका.
- सापाला मारण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.
- घराजवळ पक्षांसाठी दाणे ठेवू नका कारण त्यामुळे उंदीर येतात आणि त्यामागे सापही.
घरात साप घुसल्यास घाबरु नका, फक्त वरील सांगितलेले काम करुन पाहा. साप पळून जाईल.