How to Clean Burned Utensils: घरात वापरलं जाणारं चहाचा टोप, चपाती भाजायचा तवा, कुकर ही भांडी कशी रोजच्या रोज वापरली जातात. म्हणूनच त्यांची स्वच्छता तितक्या बारकाईने केली जात नसण्याची पूर्ण शक्यता असते. भांड्याच्या तळाशी करपलेला थर जमा होतो तेव्हा काही जण तारेचा काथ्या घेऊन जोरजोरात घासतात पण अशाने त्या भांड्यावर रेघोट्या येऊ शकतात. अगदी जाणून बुजून नाही पण कधीतरी करपलेला थर काढताना जीव अगदी थकून जातो हो ना? तर मंडळी आता तुम्हाला आम्ही काही अशा सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुमच्या कोमल हातांचे कष्ट थोडे कमी होऊ शकतील आणि तुमची भांडीही लक्ख चमकून येतील.
बेकिंग सोडा (Baking Soda)
बेकिंग सोडा हा स्वच्छेसाठी एकदम नामी उपाय मानला जातो. तुम्हाला जे भांडं स्वच्छ करायचं असेल त्यात बेकिंग सोडा नीट पसरवून घ्या. अगदी किंचित लिंबाचा रस किंवा पाणी टाकून हे आवरण ५ मिनिट भांड्यावर राहूद्या यानंतर तुमच्या नेहमीच्या भांडी घासायच्या काथ्याने भांडं नीट घासून स्वच्छ धुवून घ्या.
लिंबू किंवा कोकम
कापरलेली भांडी स्वच्छ करायची असतील तर लिंबू किंवा कोकम हा अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. यामध्ये असणारे ऍसिड हे भांड्यावरील करपट थर दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला जे भांडं स्वच्छ करायचं आहे त्यात पाणी टाकून थोडं उकळवून घ्या. पाणी साधारण कोमट झाल्यावर लिंबाची आडवी फोड किंवा काही कोकमं घेऊन भांड्याच्या करपट थरावर रगडा. हलक्या हाताने चोळून सुद्धा ही भांडी स्वच्छ होऊ शकतील.
हे ही वाचा<< तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं फायद्याचं की..? दिवसातून कोणत्या वेळी किती पाणी प्यावे?
व्हिनेगर (Vinegar)
तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून भांड्याच्या करपट थरावर लावून काही वेळ ठेवा. व ग्लोव्हज घालून मगच हे भांडं नीट घासून स्वच्छ करा. व्हिनेगरमुळे तुमच्या हाताची त्वचा रुक्ष होऊ शकते हे टाळण्यासाठी ग्लोव्ह्ज महत्त्वाचे आहेत.
(टीप: वरील लेख हा माहितीपर आहे. घरगुती उपाय अवलंबताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे)