Health Tips after Diwali: दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा सोहळा आणि अर्थातच गोडधोड खाण्याचा काळ! दरवर्षी या सणात घराघरांत स्वादिष्ट पदार्थ, मिठाई, फराळ आणि भरगच्च जेवणांचा आस्वाद घेतला जातो. पण, या सगळ्या जल्लोषात आपल्या शरीरावर अतिरिक्त ताण पडतो. रात्री उशिरापर्यंत साजरा होणारा उत्सव, जड जेवण, अनियमित झोप आणि जास्त साखर-तेलाचे सेवन यामुळे शरीरात थकवा, फुगेलपणा आणि सुस्ती जाणवू लागते; त्यामुळे दिवाळीनंतर शरीराची शुद्धी (detox) आणि पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.

१. शरीराला योग्य प्रमाणात हायड्रेट ठेवा

दिवाळीच्या काळात गोडधोड आणि खारट पदार्थांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता आणि ब्लोटिंग होऊ शकते. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नोएडा येथील डॉ. करुणा चतुर्वेदी सांगतात, “दिवाळीनंतर सर्वात पहिले पाऊल म्हणजे हायड्रेशन वाढवा. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. हे शरीराचा pH संतुलन राखते आणि पचनसंस्थेला मदत करते.” आलं, पुदिना किंवा ग्रीन टीसारख्या हर्बल टीनेदेखील पोट हलकं राहतं आणि फुगेलपणा कमी होतो.

२. पौष्टिक आहाराने शरीराला पुन्हा पोषण द्या

दिवाळीनंतर पुन्हा घरी बनवलेले आणि हलके अन्न खाण्यास सुरुवात करा. “तुमच्या आहारात हंगामी भाज्या, फळे, डाळी आणि दही, ताक, सारखे प्रोबायोटिक पदार्थ समाविष्ट करा. हे पदार्थ तुमच्या आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखतात,” असं डॉ. चतुर्वेदी सांगतात. तसेच जेवताना हळू आणि काळजीपूर्वक चावून खा, जेणेकरून पचनसंस्थेला विश्रांती मिळेल.

३. शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेला चालना द्या

योग्य झोप आणि हलकी शारीरिक हालचाल हे नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेसाठी सर्वोत्तम आहे. रोज किमान ३० मिनिटं चालणे, योगाभ्यास किंवा हलका व्यायाम, यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. हळद, आवळा, ग्रीन टी आणि बदाम यांसारखे अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थ यकृताच्या कार्यक्षमतेला चालना देतात.

४. आतड्यांचे आरोग्य पुन्हा संतुलित करा

पचनक्रिया सुधारण्यासाठी प्रोबायोटिक आहार महत्त्वाचा आहे. आहारात लोणची, ताक, इडली, ढोकळा यांसारखे किण्वित पदार्थ सामावून घ्या, असं डॉ. चतुर्वेदी सांगतात. दिवसातून पुरेसे पाणी प्या आणि काही क्षण खोल श्वास घेऊन स्वतःला रिलॅक्स करा – हे सुद्धा पचनसंस्थेला संतुलनात ठेवते.

५. निरोगी जीवनशैलीकडे परत या


दिवाळीनंतरचा काळ हा केवळ डिटॉक्स करण्याचा नाही, तर नव्याने सुरुवात करण्याचाही आहे. नियमित झोप, संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि पुरेसे पाणी . या चार गोष्टींची सवय लावल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात.

काही अतिरिक्त उपाय

झोपेचा वेळ पुन्हा ठरवा : रोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे यामुळे शरीराची अंतर्गत घड्याळे पुन्हा संतुलित होतात.

हलका व्यायाम करा : चालणे, योगा, स्ट्रेचिंग हे शरीराला हलके पण ऊर्जायुक्त ठेवतात.

गोड आणि कॅफिनयुक्त पदार्थ कमी करा : हळूहळू गोड आणि चहा-कॉफीचं प्रमाण कमी करा, ज्यामुळे झोप आणि ऊर्जा दोन्ही सुधारतात.

मन शांत ठेवा : ध्यान, श्वसनक्रिया किंवा सौम्य योगाभ्यास यामुळे ताण कमी होतो आणि मानसिक स्पष्टता वाढते.