Apamarg leaves for teeth: अनेक लोकांना दात पिवळे पडणे आणि हिरड्या दुखणे यांचा सातत्याने त्रास होत असतो. हा केवळ सौंदर्याचाच विषय नाही, तर आपल्या दातांचे आरोग्य संपूर्ण शरीराच्या आरोग्याशीदेखील संबंधित असते. जर दात व्यवस्थित नसतील, तर अन्न व्यवस्थित पचत नाही, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, डोकेदुखी व अशक्तपणा यांसारख्या समस्या उदभवतात. म्हणूनच मौखिक आरोग्य केवळ सौंदर्यापुरते मर्यादित नाही, तर शारीरिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे. पारंपरिक उपचारांसाठी लोक लवंग पावडर, हळद, खडे मीठ, मोहरीचे तेल व कडुलिंबाची पाने वापरतात. परंतु अपमार्गाचे झाड, ज्याला चिरचिटा किंवा आघाडा म्हणूनही ओळखले जाते, ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

ही वनस्पती उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते आणि तिचे विविध औषधी गुणधर्म आहेत. अपमार्गाच्या झाडाचे हे पान एक हर्बल पान आहे, जे खरोखरच दातांवर अमृतासारखे काम करते.अपमार्गाची पाने चावल्याने किंवा त्यांचा पेस्ट म्हणून वापर केल्याने दात स्वच्छ होतात आणि प्लेक जमा होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हिरड्यांमधील सूज आणि रक्तस्राव नियंत्रणात राहतो. संशोधन प्रयोगशाळेतील डॉ. भूषण म्हणतात की, जर तुम्हाला पिवळ्या दातांचा त्रास होत असेल, तर अपमार्गच्या पानांचे नियमित सेवन केल्याने तुमचे दात मजबूत आणि निरोगी होतात. या पानांची पेस्ट बनवून दररोज वापरल्याने दातांची संवेदनशीलता कमी होते. तसेच गरम किंवा थंड अन्न खाताना दातांना होणारा त्रास आणि तोंडाची दुर्गंधीदेखील दूर होते.

अपमार्गाच्या पानांचा उपयोग कसा करावा?

१. दात पिवळे होण्यापासून रोखण्यासाठी उपाय

दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अपमार्गाच्या पानांचे आयुर्वेदिक उपयोग आहेत. त्यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे थांबते, दातांमधील पोकळी कमी होते, दात मजबूत होण्यासह प्लेकही नष्ट होतो. या पानांचा वापर गुळण्या करण्यासाठी किंवा माउथवॉश’साठी त्यांचा वापर केल्याने दातांची संवेदनशीलता आणि संसर्गबाधेवर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. त्यामुळे रिकाम्या पोटी या वनस्पतीची पाने चावणे किंवा हिरड्यांना मालिश करणे आणि त्याच्या कोमट पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर आहे.

२. माउथवॉश तयार करण्याची पद्धत :

अपमार्गाची ४-५ ताजी पाने एक कप पाण्यात ३-४ मिनिटे उकळवा. नंतर ती गाळून घ्या आणि सकाळी व संध्याकाळी गुळण्या करा. हे नैसर्गिक माउथवॉश म्हणून उत्तम काम करतो.

३. मंजन तयार करण्याची पद्धत :

अपमार्गाच्या वाळलेल्या पानांची पावडर बनवा. त्यात मोहरीचे तेल किंवा मध मिसळा आणि हिरड्यांना २-३ मिनिटे मालिश करा. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. हे मंजन संवेदनशील दातांना सामान्य स्थिती प्राप्त करून देते, पिवळे दात पांढरे करते आणि एकूणच तोंडाचे आरोग्य सुधारते.

अपमार्गाचे झाडाचा (Chirchita/Latjeera) असा हा नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. ही वनस्पती म्हणजे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी एक अजोड असा नैसर्गिक साथीदार आहे.