धावपळीची जीवनशैली आणि अनियमित आहार यांमुळे तणाव ही सामान्य समस्या बनली आहे. मानसिक तणावामुळे शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवरही वाईट परिणाम होतो. बऱ्याचदा रात्री कामाच्या किंवा इतर ताणतणावामुळे आपल्याला नीट झोप येत नाही आणि शरीरात ऊर्जेचा अभाव असल्याने दिवसभर थकवा जाणवतो. आजच्या पिढीला रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय झाली आहे, ज्यामुळे आपल्या शरीराचे घड्याळ बिघडते आणि ही समस्या दीर्घकाळात गंभीर आजारांना कारणीभूत ठरते. नीट झोप न येणे ही बाब मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
नोएडा येथील योसोम योगा स्टुडिओमधील योग शिक्षक रजनीश शर्मा म्हणतात की, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग्य झोप मिळणे आवश्यक आहे. पण, आधुनिक जीवनात कामाचा जास्त ताण यामुळे लोक झोपण्यापूर्वी त्यांचे मन शांत करू शकत नाहीत. त्यामुळे निद्रानाश, ताण व थकवा येतो. अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी काही हलकी योगासने केल्याने शरीर आणि मन अशा दोघांना आराम मिळतो आणि त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
१. बालासन
झोपेसाठी बालासन खूप फायदेशीर आहे. त्यासाठी गुडघे वाकवून जमिनीवर बसा. दोन्ही पायांची बोटे एकत्र आणा आणि टाचांवर बसा. तुमचे हात पुढे करा किंवा ते तुमच्या शरीराजवळ ठेवा. नंतर तुमचे डोके जमिनीवर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. बालासन नसांना शांत करते, तणाव कमी करते. तसेच त्यामुळे पाठ व खांद्यांचा ताण दूर होतो आणि खोल श्वास घेण्यास मदत मिळते.
२. विपरीत करणी मुद्रा
भिंतीला टेकून पाठीवर झोपा. तुमचे पाय भिंतीवर सरळ ठेवा आणि तुमचे हात बाजूला आरामशीर ठेवा. हे आसन नसा शांत करते, मनाला आराम देते, पायांचा थकवा आणि सूज कमी करते आणि पाठदुखीपासून आराम मिळवून देते.
३. सुप्त मत्सेंद्रयासन
प्रथम पाठीवर झोपा. नंतर तुमचे पाय वाकवा आणि ते तुमच्या छातीकडे आणा. तुमचे पाय एका बाजूला आणि तुमचे डोके दुसऱ्या बाजूला वळवा. तुमचे खांदे जमिनीवर सपाट ठेवा. त्यामुळे पचन सुधारते, पाठीचा ताण कमी होतो आणि शरीर व मन शांत होते.
४. सुप्त बद्ध कोनासन
प्रथम पाठीवर झोपा. त्यानंतर पाय एकत्र करा आणि गुडघे वाकवा, हात बाजूला करा. या आसनामुळे ताण आणि थकवा कमी होतो, कंबर व छाती मोकळी होते, श्वासोच्छ्वास वाढतो आणि नर्व्हस सिस्टीम संतुलित राहते.
५. शवासन
प्रथम पाठीवर झोपा, हात व पाय आरामात पसरवा. त्यानंतर डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. हे आसन मन आणि शरीराला पूर्णपणे शांत करते, हृदय गती व रक्तदाब नियंत्रित करते आणि झोपण्यापूर्वी खोल विश्रांती देते.
ही योगासने नियमित केल्यास नीट झोप येते, तणाव कमी होतो आणि शरीर व मन दोन्ही ताजेतवाने राहतात.