how to sleep better: बऱ्याचदा कामामुळे, फोन स्क्रोलिंग किंवा ताणतणावामुळे आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का की, आठ तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने तुम्हाला थकवा किंवा आळस येतोच. त्याशिवाय तुमच्या मूडवरही परिणाम होतो? अलीकडच्या संशोधनानुसार, कमी झोप घेणाऱ्या लोकांना नैराश्य आणि चिंता यांसारख्यांच्या मनात नकारात्मक विचार वारंवार येण्याची शक्यता जास्त असते. झोप ही फक्त शरीराच्या विश्रांतीसाठी नसून, ती मनाचं संतुलन राखण्यासाठीही आवश्यक आहे.
संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना भावनिक प्रतिक्रिया निर्माण करणारी विविध चित्रं दाखवण्यात आली आणि त्यांच्या डोळ्यांच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला. या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, ज्यांना नियमितपणे झोपेचा त्रास होतो त्यांना नकारात्मक गोष्टींपासून लक्ष हटवणे कठीण जाते. म्हणजेच, झोप न झाल्याने नकारात्मक विचार मनात अधिक वेळ राहतात आणि ते व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करतात.
झोपेचा अभाव केवळ तुमच्या मूडवरच परिणाम करीत नाही, तर अनेक आरोग्य समस्यांनाही आमंत्रण देतो. म्हणूनच रात्रीची चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. पण, जर तुम्हाला झोप येत नसेल, तर काही नैसर्गिक पदार्थ तुम्हाला मदत करू शकतात. चला पाहूया कोणते पदार्थ झोप सुधारण्यास उपयुक्त ठरतात.
१. केळी
केळी झोपेसाठी उत्कृष्ट मानली जातात. त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात, जे नैसर्गिक muscle relaxants आहेत. तसेच केळीतील कार्बोहायड्रेट्स झोप येण्यास मदत करतात. झोपायच्या आधी एक केळं खाल्लं, तर शरीराला विश्रांती मिळते आणि मन शांत होतं.
२. चेरी
चेरी हे काही नैसर्गिक अन्नांपैकी एक फळ आहे, ज्यात मेलाटोनिन हे झोप नियंत्रित करणारे हार्मोन आढळते. हे हार्मोन पाइनल ग्रंथी तयार करते आणि आपले झोप व जागेचे चक्र नियंत्रित करते. त्यामुळे रात्री चेरी खाणे किंवा त्याचा ज्यूस घेणे झोप सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते.
३. बदाम
बदामात मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, जे झोपेसाठी महत्त्वाचे आहे. ते रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते आणि झोपेत शरीराला आवश्यक पोषण देते. दररोज काही बदाम खाल्ल्यास रात्री झोप अधिक चांगली लागते.
४. मध
झोपण्यापूर्वी एक चमचा मध घेतल्यास शरीरात इन्सुलिनचे प्रमाण किंचित वाढते. त्यामुळे ट्रिप्टोफॅन मेंदूत प्रवेश करतो आणि झोपेसाठी आवश्यक रसायने तयार करतो. मध हा नैसर्गिक आरामदायी पदार्थ असल्याने, तो शरीराला शांत करतो आणि झोप लागणे सोपे करतो.
झोप ही आरोग्य, मनःशांती आणि उत्पादकतेचा पाया आहे. त्यामुळे ती दुर्लक्षित न करता, आपल्या दिनक्रमात चांगल्या झोपेसाठी हे साधे उपाय अवश्य समाविष्ट करा.