IFS Himanshu Tyagi Happiness Tips: जगभरात तंत्रज्ञान सतत बदलतेय. यामुळे लोकही एखाद्या यंत्राप्रमाणे घड्याळ्याच्या काट्यावर धावत आहेत. तंत्रज्ञानामुळे जीवन सोपे झाले, यामुळे ज्या कामाला तासभर लागत होता ते अवघ्या काही मिनिटांत करता येऊ लागले. असे असूनही लोक पूर्वीपेक्षा अधिक उदास, निराश दिसू लागले आहेत. कामाचा ताण, नातेसंबंधांमधील समस्या, आर्थिक अडचण अशा अनेक कारणांमुळे हल्ली लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब होत आहे. ते नेहमी नाखूष दिसतात. अशा परिस्थितीत आयएफएस अधिकारी हिमांशू त्यागी यांनी लोकांना आनंदी जीवन जगण्यासाठी काही सोपे मार्ग सांगितले आहेत.
आनंदी जीवन कसे जगायचे?
भारतीय वन सेवा अधिकारी हिमांशू त्यागी (Himanshu Tyagi IFS) एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) अनेकदा कोणत्याही विषयावर त्यांचे स्पष्ट मत मांडतात. आता त्यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी काही सोपे मार्ग सांगितले आहेत.
त्यांनी म्हटले की, तुमचा आनंद तुमच्या दृष्टिकोनावर, मानसिकतेवर अवलंबून असतो. जागरूक व्यक्तीला जगातील प्रत्येक गोष्टीत आनंद असतो. मात्र, अनभिज्ञ व्यक्तीसाठी स्वर्गदेखील नरकासारखे असते.
हिमांशू त्यागी म्हणाले, ‘छोट्या गोष्टी खूप आनंद देऊ शकतात, आनंदी राहण्यासाठी तुम्हाला अब्जाधीश किंवा सिव्हिल सर्व्हंट असण्याची गरज नाही. आनंद स्वतःमध्येच असतो. ही किती विचित्र गोष्ट आहे की, आपण बाहेरच्या जगात आनंद शोधतो, पण तो आपल्यातच असतो. आपण आपले घर न शोधता जग फिरतो.
आनंदी राहण्यासाठी सोप्या टिप्स:
आयएफएस हिमांशू त्यागी यांनी पुढे सांगितले की, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी रहायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या काही टिप्स वापरून पाहू शकता, जसे की-
१. लोकांना ‘धन्यवाद’ म्हणा.
२. इतरांवर हसू नका.
३. तुम्हाला ज्यांनी मदत केली त्या प्रत्येकाची प्रशंसा करा.
४. समस्यांवर नव्हे तर संधींवर लक्ष केंद्रित करा.
५. काय वाईट आहे हे न पाहता काय चांगले आहे ते पाहा.
६. शांत रहा, स्वतःचे विश्लेषण करा.
७. इतरांना शक्य तितकी मदत करा.