Indian Railways Rules: भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं. देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग दररोज रेल्वेने प्रवास करतो. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ट्रेनमध्ये प्रवासाबाबतचे नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. यापैकी एक नियम ट्रेनमध्ये झोपण्यासंदर्भात देखील आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना जर तुम्हाला झोप घ्यायची सवय असेल तर हा नियम एकदा वाचाच. अन्यथा भविष्यात तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

रेल्वेच्या नवीन नियमांनुसार आता तुमच्या सीट, डब्यात किंवा डब्यातील कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकणार नाही. मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. प्रवाशांच्या झोपेत कोणताही अडथळा येऊ नये आणि त्यांना प्रवासादरम्यान शांत झोप लागावी यासाठी रेल्वेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बरेच प्रवासी रात्री उशिरापर्यंत फोनवर मोठमोठ्याने बोलतात किंवा गाणी ऐकतात. रेल्वे एस्कॉर्ट किंवा मेंटेनन्स कर्मचारीही मोठ्या आवाजात बोलत असल्याच्याही काही प्रवाशांच्या तक्रारी होत्या. याशिवाय अनेक प्रवासी रात्री १० वाजल्यानंतरही डब्ब्यातील दिवे लावतात. त्यामुळे त्यांची झोप उडते. या पार्श्वभूमीवर रेल्वेने नवा नियम केला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रवाशाने नियम न पाळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.

आणखी वाचा : अक्कल दाढेच्या दुखण्याने तुमची झोप उडाली आहे का? मग हे उपाय करा आणि चुटकीसरशी आराम मिळवा

जाणून घ्या काय आहेत नवीन नियम
ट्रेनमध्ये प्रवास करताना रात्री १० नंतर जर तुम्ही मोबाईलवर जोरजोरात बोलत असाल तर कडक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. नवीन नियमांनुसार रात्रीच्या प्रवासात प्रवासी मोठमोठ्याने बोलू शकत नाहीत आणि गाणे मोबाईलवर वाजवू शकत नाहीत. कोणत्याही प्रवाशाने तक्रार केल्यास ती सोडवण्याची जबाबदारी ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांची असेल.