उपचाराचा वाढता खर्च आणि विम्याबद्दल वाढती जागरूकता या दोन कारणांमुळे आरोग्य विमा पॉलिसी घेण्याऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. सामान्य आरोग्य विमा पॉलिसी तुमच्या सामान्य दवाखान्याच्या बिलांसाठी पुरेशी असते, पण कर्करोग, पक्षाघात किंवा हृदयविकार यांसारख्या मोठ्या आजारांसाठी अशी पॉलिसी अपुरी पडण्याची दाट शक्यता असते. असा एखादा मोठा आजार तुम्हाला भावनिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या हतबल करू शकतो. अधिक काळ चालणाऱ्या इलाजामुळे तुमची नोकरी आणि मिळकत, तसेच तुमची आयुष्यभराची बचत धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा मोठ्या आजारांवर होणाऱ्या खर्चापासून रक्षणासाठी एक उपाय म्हणजे टॉप-अप विमा प्लॅन घेणे. पण याहून अधिक प्रभावी मार्ग, ज्याने तुमच्या आर्थिक स्वास्थ्याची घडी मोडणार नाही, म्हणजे क्रिटिकल इलनेस कव्हर होय. या पॉलिसीमध्ये सूचीबद्ध आजारांचे निदान झाल्यावर विमाधारकाला एकरकमी विमाधन मिळते. आजारपणामुळे तुमची मिळकत दीर्घ काळ बंद झाल्यास या पॉलिसीद्वारे तुम्ही त्याची काही अंशी पूर्तता करू शकता.

क्रिटिकल इलनेस कव्हर म्हणजे काय?

इतर साधारण विमा पॉलिसींच्या उलट क्रिटिकल इलनेस विमा पॉलिसीमध्ये सूचीबद्ध आजाराचे निदान झाल्यावर विमा धन विमाधारकाला एकरकमी दिले जाते. यामुळे जर विमाधारकाला काही महिने किंवा वर्ष आजारपणामुळे मिळकत होणार नसली, किंवा अपंगत्व येणार असले, तर त्याची आर्थिक भरपाई होते. या पॉलिसीमध्ये फक्त दवाखान्याची बिले दिली जातात असे नाही, तर त्यासोबतच मिळकतीचे नुकसानही भरून निघते.

निरनिराळ्या विमा कंपनी निरनिराळ्या आजारांसाठी ही पॉलिसी देतात. साधारणपणे या पॉलिसीमध्ये किमान ५ पासून कमाल ३७ आजारांची यादी असते. या यादीत कर्करोग, बायपास शस्त्रक्रिया, किडनीचा आजार, हृदयाचा वॉल्व बदलणे, अवयव प्रतिरोपण आणि संपूर्ण पक्षाघात इत्यादी आजार असतात. प्रत्येक क्रिटिकल इलनेस पॉलिसीमध्ये प्रतिक्षा कालावधी आणि उत्तरजीविता कालावधी असतात. प्रतिक्षा कालावधीचा अर्थ असा की पॉलिसी घेणे आणि त्यात सूचीबद्ध आजाराचे निदान होणे या दरम्यान एक विशिष्ट कालावधी जाणे गरजेचे असते. तसेच उत्तरजीविता कालावधीचा अर्थ असा की आजाराचे निदान झाल्यानंतर पॉलिसीधारकाने त्या कालावधीपर्यंत जिवंत राहणे गरजेचे असते. अशा पॉलिसींमध्ये उत्तरजीविता कालावधी अंदाजे ९० दिवसांचा असतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

कव्हर किती हवे : तुम्हाला गरज असलेल्या विमाधनाचा आकडा तुमच्या ईएमआय किंवा घरभाडे, तसेच तुमचे इतर खर्च या सगळ्याचा हिशेब करून ठरवावा लागेल कारण दवाखान्यात असताना तुमची मिळकत बंद होण्याची शक्यता असेल. तरीही हा आकडा फार असू नये कारण त्यासाठी तुम्हाला तेवढेच अधिक प्रीमियम द्यावे लागेल.

सूचीबद्ध आजार पाहून घ्या : प्रत्येक विमा कंपनी निराळे आजार कव्हर करीत असते. कर्करोग, पक्षाघात, हृदयविकार, कोरोनरी आजार इत्यादी साधारणपणे क्रिटिकल इलनेस पॉलिसीमध्ये सूचीबद्ध असतात, तरीही तुम्हाला ती सूची नीट पाहून घेतली पाहिजे.

आरोग्य विमा पॉलिसीपेक्षा वेगळी : क्रिटिकल इलनेस पॉलिसी आरोग्य विमा पॉलिसीच्या ऐवजी घेऊ नका. आरोग्य विमा पॉलिसीसोबतच क्रिटिकल इलनेस पॉलिसी घ्या. मिळकत कर अधिनियमच्या कलम 80 (डी) प्रमाणे तुम्हाला दिलेल्या प्रीमियम वर कर-लाभ सुद्धा मिळतात.

 

आदिल शेट्टी,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीईओ, बँकबझार