Which Vegetables Packs More Vitamin C Than Milk : फळे आणि भाज्यांद्वारे शरीराला आवश्यक त्या पोषक तत्त्वांची कमतरता भरून निघू शकते. त्यासाठी आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करावा, असा सल्ला डॉक्टरांपासून ते घरातील मोठी मंडळीही आपल्याला देत असतात. दूध हा कॅल्शियमचा, तर संत्र्यांना व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते. पण, आणखीन एक सुपरफूड असे आहे, जे व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम यांच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक मानले जाते.

केल (Kale) ही एक अशी पालेभाजी आहे, ज्यामध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. त्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आणि प्रति ग्रॅम दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. केलमध्ये व्हिटॅमिन के, बीटा-कॅरोटीन, लोह व अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात, ज्यामुळे हाडांचे आरोग्य, रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते.

तर केलमधील पोषक घटक तुमच्या आरोग्यासाठी कसे उपयोगी ठरतात ते जाणून घेऊया…

व्हिटॅमिन सी – केलमध्ये अनेक लिंबूवर्गीय फळांपेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. हे जीवनसत्त्व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास, कोलेजन उत्पादन सुधारण्यास व शरीराचे संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

कॅल्शियम – दुग्धजन्य पदार्थांमध्ये केलचा समावेश केला जात नसला तरीही केलमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे हाडे, दात मजबूत होतात आणि स्नायूंच्या कार्याला आधार मिळतो, ज्यामुळे दूध पिण्याचा कंटाळा करणाऱ्यांसाठी हा बेस्ट पर्याय ठरतो.

लोह – केलमध्ये वनस्पतीजन्य लोह असते. लोहामुळे आपल्या रक्तात हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत होते आणि त्यामुळे शरीरात ऑक्सिजन व्यवस्थित प्रवाहित होण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती मासे, मांस यांसारखे लोहयुक्त पदार्थ खात नाहीत, त्यांच्यासाठी केलसारखी भाजी खूप फायदेशीर ठरते.

अँटिऑक्सिडंट्स – केलमध्ये क्वेर्सेटिन व केम्फेरॉल यांसारखी संयुगे असतात, जेीमुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. त्यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो आणि वृद्धत्व कमी होते.

व्हिटॅमिन के – केलमधील व्हिटॅमिन के रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत, हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. एक कप केल खाल्ल्यावर दिवसाला लागणाऱ्या व्हिटॅमिन केपेक्षा अनेक पटींनी ते जास्त प्रमाण मिळते, ज्यामुळे एकूण आरोग्यास फायदा होतो.

बीटा-कॅरोटीन – कॅरोटीनने भरलेले केल बीटा-कॅरोटीनने समृद्ध असते. बीटा-कॅरोटीन एक संयुग आहे, ज्याचे शरीरात व्हिटॅमिन एमध्ये रूपांतर होते. हे पोषक तत्त्व निरोगी त्वचा, दृष्टी व रोगप्रतिकार शक्तीसाठी महत्त्वाचे ठरते.

हृदयाच्या आरोग्यास समर्थन – केलमधील फायबर, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यास चांगले योगदान देतात. त्याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि नैसर्गिकरीत्या रक्तदाब कमी करण्यास मदत होते.

कॅलरीज कमी आणि पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त – केल पोषक तत्त्वांनी समृद्ध असले तरी त्यामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे पोषणाशी तडजोड न करता, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.