Brain eating amoeba symptoms: मेंदू खाणाऱ्या अमीबाने केरळमध्ये एकच दहशत पसरली आहे. प्राथमिक अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस (PAM)च्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर केरळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी हाय अलर्ट जारी केला आहे. पीएएम या ‘मेंदू खाणाऱ्या अमीबा’ नेग्लेरिया फाउलेरीमुळे होणारा एक मेंदूचा घातक संसर्ग आहे. केरळमध्ये या वर्षी १२० हून अधिक प्रकरणांची याबाबत नोंद झाली आहे आणि १९ जणांचा मृत्यू झाला आहे, यापैकी बरेच मृत्यू अलीकडच्या आठवड्यात झाले आहेत.
दूषित गोड पाणी नाकात गेल्यावर संसर्ग होतो, ज्यामुळे अमीबा सायनसद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतो. हा संसर्ग नेग्लेरिया फाउलेरी नावाच्या मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे होतो, जो मेंदूच्या ऊतींचा नाश करतो. याच्या संसर्गामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये मेंदूला गंभीर सूज येते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तो टाळण्यासाठी या आजाराबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विहिरी, जलतरण तलाव व तलावातील पाणी नाकात शिरल्यावर हा संसर्ग वेगाने पसरतो. हा संसर्ग सामान्य पिण्याच्या पाण्याद्वारे पसरत नाही, तर नाकातून मेंदूत पाणी शिरल्याने होतो. नेग्लेरिया फाउलेरी म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत आणि या संसर्गाची बाधा कशी टाळायची ते जाणून घेऊया.
नेग्लेरिया फाउलेरीची लक्षणे
प्राथमिक अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस (पीएएम) हा एक अत्यंत दुर्मीळ, परंतु गंभीर संसर्ग आहे. नेग्लेरिया फाउलेरीची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये साधारणपणे दोन ते १५ दिवसांत लक्षणे दिसून येतात. चला तर मग याची सुरुवातीची लक्षणं जाणून घेऊयात.
- तीव्र डोकेदुखी
- ताप
- मळमळ आणि उलट्या
- मानसिक बदल (गोंधळ, सुस्ती)
- झटके
अमीबा नाकातून मेंदूत प्रवेश करतो आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर (सीएनएस) परिणाम करतो, ज्यामुळे मेंदूत जळजळ होते आणि पेशींचे नुकसान होते. सीडीसीच्या मते, लक्षणे दिसू लागल्यानंतर संसर्ग वेगाने वाढतो. बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्ण ५-७ दिवसांच्या आत मरतो.
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचा कहर
रॉयटर्सच्या अहवालानुसार, २०२४ पासून केरळमध्ये ‘मेंदू खाणारा अमीबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेग्लेरिया फाउलेरीशी संबंधित संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. २०२५ मध्ये आतापर्यंत ६९ रुग्ण आढळले आहेत; १९ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२४ मध्येही रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली, ज्यामध्ये ६१ रुग्ण आढळले आणि त्यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी २०१६ ते २०२२ पर्यंत केरळमध्ये या संसर्गाची फक्त आठ प्रकरणे नोंदवली गेली होती. परंतु, २०२३ मध्ये ही संख्या ३६ पर्यंत वाढली, ज्यामध्ये ९ मृत्यू झाले.
मेंदू खाणाऱ्या अमीबाच्या संख्येत वाढ होण्याची कारणे?
हवामानातील बदल, वाढलेली उष्णता आणि जलसाठ्यांमध्ये दूषित पाणी ही या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची कारणे आहेत.
मेंदू खाणाऱ्या अमीबापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?
- घाणेरड्या किंवा गरम पाण्यात पोहणे टाळा.
- नाकात पाणी जाऊ नये म्हणून नाकात क्लिप वापरा.
- तलाव आणि नद्यांमध्ये फक्त स्वच्छ, क्लोरिनयुक्त पाणी वापरा.
- कोणत्याही संशयास्पद पाण्याच्या स्रोतात अंघोळ करणे किंवा खेळणे टाळा.