Kidney Cancer Symptoms: किडनी हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीराची स्वच्छता करतो. किडनीचं काम रक्त शुद्ध करणे आणि शरीरात साठलेले विषारी पदार्थ बाहेर काढणे आहे. चुकीच्या आहारामुळे आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे किडनीवर थेट परिणाम होतो. अशा सवयींमुळे किडनी कॅन्सर होऊ शकतो.

किडनी कॅन्सरला मूत्रपिंडाचा कॅन्सर किंवा रिनल कॅन्सर (Renal Cancer) असेही म्हणतात. किडनी कॅन्सर तेव्हा होतो, जेव्हा किडनीतील पेशी अनियमितरीत्या वाढायला लागतात आणि गाठीचे रूप घेतात. हा कॅन्सर इतक्या झपाट्याने वाढतो आहे की पुरुष आणि महिला दोघांमध्येही तो टॉप १० कॅन्सरमध्ये मोजला जातो.

मायो क्लिनिकच्या माहितीनुसार, प्रौढांमध्ये किडनी कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार “रिनल सेल कार्सिनोमा” (Renal Cell Carcinoma) आहे. याशिवाय काही दुर्मीळ प्रकारचे किडनी कॅन्सरही होऊ शकतात. मुलांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये, किडनी कॅन्सरचा वेगळा प्रकार दिसतो, ज्याला “विल्म्स ट्यूमर” (Wilms Tumor) म्हणतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता किडनी कॅन्सरची ओळख सुरुवातीच्या टप्प्यात करता येते, ज्यामुळे उपचार अधिक यशस्वी होऊ शकतात.

HCG मानवता कॅन्सर सेंटर, नाशिकचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राज नागरकर यांनी सांगितले की, किडनी कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात बहुतेक वेळा विशेष लक्षणे दिसत नाहीत. पण, काही सुरुवातीची चिन्हे वेळेवर ओळखली तर तपासणी आणि उपचार लवकर सुरू करता येतात, ज्यामुळे उपचार यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते. चला तर मग, पाहूया किडनी कॅन्सर झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसू शकतात.

लघवीतून रक्त येणं

लघवीमध्ये रक्त येणं हे किडनी कॅन्सरचं लक्षण असू शकतं. वेदना न होता लघवीमध्ये रक्त दिसणं हा किडनी कॅन्सरचा सुरुवातीचा इशारा असू शकतो. हे लक्षण लगेच ओळखा आणि डॉक्टरांना दाखवा.

कमरेच्या खालच्या भागात किंवा बाजूला सतत वेदना

जर कमरेच्या खालच्या भागाला दुखापत झाली नसेल आणि तरीही वेदना सतत होत असतील, तर ते चिंता करण्यासारखे असू शकते. कंबरेच्या खालच्या भागातील हा त्रास किडनी कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

कमरेच्या एका बाजूला गाठ किंवा सूज येणे

तज्ज्ञांच्या मते जर कमरेच्या एका बाजूला कोणत्याही प्रकारची गाठ किंवा सूज आली आहे असं वाटत असेल तर लगेच डॉक्टरांची भेट घ्या. किडनी कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये कधी कधी गाठ असल्यासारखी वाटू शकते.

अचानक वजन कमी होणे आणि भूक कमी लागणे

डाएटशिवाय किंवा वर्कआउट केल्याशिवाय अचानक वजन कमी होणं किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. शरीरात दिसणारे हे बदल चुकूनही दुर्लक्षित करू नका आणि लगेच डॉक्टरांना दाखवा.

सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

शरीरात अशक्तपणा आणि उर्जेचा अभाव बराच काळ टिकून राहिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरात सतत अशक्तपणा आणि थकवा येत राहीला हे किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.