Early Signs of Kidney Disease: किडनी म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचा अवयव. रक्त शुद्ध करणे, शरीरातील पाणी आणि क्षार यांचा समतोल राखणे, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणे या सगळ्या जबाबदाऱ्या किडनी पार पाडते. पण, किडनी खराब होऊ लागली तर शरीर काही खास इशारे देऊ लागते. धक्कादायक बाब म्हणजे हे इशारे थेट किडनीच्या भागात जाणवत नाहीत, तर शरीराच्या अगदी वेगळ्या भागांत वेदना जाणवू लागतात.

डॉक्टरांच्या मते, किडनीच्या समस्या वेळीच ओळखल्या तर त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. पण, लक्षणं नजरेआड केली तर परिस्थिती गंभीर होऊन डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटची वेळ येऊ शकते, म्हणूनच शरीराच्या ‘या’ पाच भागांमध्ये जाणवणाऱ्या वेदना दुर्लक्षित करू नयेत.

शरीराच्या ‘या’ ५ वेदना देतायत किडनी बिघडल्याचा इशारा

१. कमरेखालील पाठदुखी

सर्वात सामान्य लक्षण म्हणजे पाठदुखी. पण, ही वेदना साधी स्नायूंची नसून किडनीशी निगडित असू शकते. बरगडीखालील बाजूला सतत बोचरा त्रास किंवा लाटेसारख्या तीव्र वेदना होतायत का? तर ही किडनी स्टोन किंवा संसर्गाची सुरुवात असू शकते.

२. पोटदुखी

किडनीत संसर्ग किंवा ब्लॉकेज झाल्यास वेदना पुढे पोटात जाणवू शकते. अचानक क्रॅम्प, पोटात दडपण जाणवणे किंवा मळमळीसोबत तीव्र वेदना होत असल्यास किडनीकडे लक्ष द्या.

३. जांघ-जननेंद्रियाजवळील वेदना

किडनी स्टोन खाली सरकू लागला की मूत्रनलिकेला धक्का बसतो आणि तीव्र वेदना थेट जांघ व पेल्विक भागात जाते. ही वेदना लोक सहसा इतर कारणाशी जोडतात, पण ती किडनीशी संबंधित असू शकते.

४. पाय, टाच व पोटरी सुजणे

किडनी नीट काम करत नसेल तर शरीरात पाणी साचू लागतं. परिणामी पाय सुजणे, टाचा घट्ट होणे किंवा पोटऱ्यांमध्ये वेदना जाणवते. काहीवेळा जळजळ, मुंग्या येणे अशी लक्षणंही दिसतात.

५. छाती व बरगडीखाली वेदना

अगदी अनपेक्षित पण गंभीर चिन्ह. किडनी फेल होऊ लागली की शरीरात पाणी फुफ्फुसाभोवती किंवा हृदयाभोवती साचतं. त्यामुळे छातीत दडपण, बरगडीखाली वेदना, श्वास घेण्यास त्रास होतो. हे लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

इशारा दुर्लक्षित केल्यास धोका!

किडनी खराब होण्याची सुरुवात अशा असामान्य वेदनांनी होते. यासोबत वारंवार लघवी लागणे, लघवीत रक्त, थकवा, चेहरा-पाय सुजणे, ब्लड प्रेशर वाढणे ही लक्षणं दिसली तर तो धोक्याचा इशारा आहे, त्यामुळे शरीरात कुठेही अशी वेदना जाणवल्यास ती सामान्य समजून थांबू नका. किडनी तुमचं जीवन वाचवते, आता तुमचं काम आहे तिचं रक्षण करणं.