How to Clean Kitchen Chimney at Home: घरात रोजचा स्वयंपाक करताना धूर, तेलकट वास आणि धूळकण शोषून घेणारी स्वयंपाकघरातील चिमणी ही केवळ सजावटीची वस्तू नाही, तर आरोग्यासाठी महत्त्वाची कवचासारखी असते. पण, अनेकदा लोक दुर्लक्ष करतात आणि महिनोनमहिने चिमणीची साफसफाई होत नाही. मग काय होतं? हळूहळू तिच्या भिंतींवर तेलकट थर बसतो, धूर अडकतो आणि मशीनचा वेग मंदावतो. पुढे जाऊन हीच चिमणी धोकादायक ठरू शकते.

स्वयंपाकघरात रोज धूर, तेलकट वास आणि धूळकण शोषून घेणारी चिमणी आपल्याला सुरक्षित ठेवते… पण तुम्हाला माहिती आहे का, हीच चिमणी वेळेवर स्वच्छ न केल्यास एका स्फोटक धोक्याला आमंत्रण ठरू शकते? अनेक कुटुंब याकडे दुर्लक्ष करतात आणि मग अचानक तिच्यातून उठणारा धूर, विचित्र वास किंवा आग लागल्याचे प्रकार घडतात. नेमकं चिमणीमध्ये असं काय साचतं की ती घरासाठी धोक्याची घंटा ठरते? आणि त्यातून सुटका करून घेण्याचे सोपे, घरगुती पण प्रभावी उपाय कोणते आहेत? हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा…

तज्ज्ञ सांगतात, ‘दर तीन महिन्यांनी चिमणीची नीट साफसफाई झाली पाहिजे.’ नियमित देखभाल केली तर तेलकटपणा साचत नाही आणि चिमणीची कार्यक्षमता पूर्ववत राहते.

साफसफाईपूर्वी लक्षात ठेवा

  • चिमणी साफ करताना सर्वात पहिली खबरदारी म्हणजे तिचा वीजपुरवठा बंद करणे, अन्यथा स्वच्छतेदरम्यान अपघात होऊ शकतो.
  • यानंतर चिमणीतील फिल्टर आणि पॅनेल्स काढून घ्या. यांच्यावरच सगळ्यात जास्त तेलकट थर साचतो. हे भाग कोमट पाणी आणि सौम्य डिटर्जंटमध्ये भिजवून ठेवा. मग हलक्या हाताने ब्रशने घासून घ्या.

नैसर्गिक उपायांचा कमाल परिणाम

महागड्या केमिकल्सऐवजी घरातलेच सोपे उपाय वापरले तरी काम भागतं. उदाहरणार्थ, बेकिंग सोडा आणि पाणी याची पेस्ट करून ती चिकटलेल्या भागावर लावा. थोडा वेळ तसेच ठेवा आणि मग हलक्या हाताने घासा. तसेच व्हिनेगर (सिरका) पाण्यात मिसळून बाहेरील भाग पुसल्यास तेलकटपणा क्षणात नाहीसा होतो.

बाह्य भाग आणि हवेचा नळ

फक्त आतला भागच नाही तर बाहेरचा हूड, कोपरे आणि कडा हेसुद्धा स्वच्छ पुसून घ्यावेत. यामुळे दिसायलाही आकर्षक वाटतं आणि घरातील स्वच्छतेची पातळी वाढते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हेंटिलेशन डक्ट. धूर बाहेर जाण्याचा हा मार्ग स्वच्छ नसेल तर सगळा धूर घरातच पसरतो, म्हणूनच तो मोकळा ठेवणं आवश्यक आहे.

तज्ज्ञांची मदत घ्या

वर्षातून किमान एकदा तरी चिमणीची प्रोफेशनल सर्व्हिसिंग करून घ्या. तज्ज्ञ तांत्रिक तपासणी करतात आणि मशीनच्या आयुष्यात भर घालतात.

थोडक्यात सांगायचं झालं तर घाणेरडी चिमणी म्हणजे आरोग्यासाठी धोका! म्हणूनच वेळोवेळी तिची काळजी घ्या आणि या सोप्या उपायांनी घरातील वातावरण निरोगी ठेवा.