स्वयंपाकघर हे घरातील असे एक ठिकाण आहे जिथे स्वच्छतेची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. कारण तिथे आपण कुटुंबातील व्यक्तींसाठी अन्नपदार्थ तयार करत असतो. पण हे अन्नपदार्थ तयार करत असताना स्वयंपाकघरातील टाईल्सवर अथवा भिंतीवर तेलाचे, मसाल्याचे डाग उडतात. यावेळी चिकट झालेले स्वयंपाकघर आणि टाईल्स स्वच्छ करण्यासाठी आपण कॉटनचे कपडा वापरतो. अनेकजण स्वयंपाकघरात हात पुसण्यासाठी कपडा वापर करतात. त्यामुळे तो कपडा लवकर काळा, चिकट आणि कडक होतो. तोच अस्वच्छ कपडा काहीजण ताट पुसण्यासाठी वापरतात. याने आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. अशापरिस्थितीत स्वयंपाकघरामधील कपडा नियमित धुण्याची गरज असते. मात्र काहीवेळा धुतल्यानंतरही त्याचा चिकटपणा कमी होत नाही. अशावेळी स्वयंपाकघरातील कपड्याचा चिकटपणा आणि घाण स्वच्छ करण्यासाठी खालील सोप्या ट्रिक्स वापरा.
किचनमधील कपडा स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रिक
१) लिंबू आणि व्हिनेगरचा वापर करा
लिंबू आणि व्हिनेगरमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. याव्यतिरिक्त हे एक क्लिनिंग एजंट म्हणून देखील काम करतात. अशावेळी स्वयंपाकघरामधील कपड्याची चमक टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा मीठ घ्या आणि त्यात समान प्रमाणात व्हिनेगर आणि लिंबू मिसळा. आता या मिश्रणात किचनमधील कपडा काही तास भिजत ठेवा आणि त्यावर ब्रश मारा. यामुळे सर्व डाग निघून जातील. आता एक तासाने कपडा बाहेर काढा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
२) बेकिंग पावडरच्या पाण्याने धुवा
बेकिंग सोडा हे कपड्यावरील काळे डाग आणि चिकटपणा काढून टाकण्यासाठी एक उत्तम क्लिनिंग एजंट म्हणून काम करतो. अशावेळी स्वयंपाकघरामधील काळे झालेला कपडा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साधारण दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा घ्या, एका बादलीत गरम पाणी घ्या आणि त्यात बेकिंग सोडा टाका आणि त्यात स्वयंपाकघरातील कपडा भिजवा, काही तास कपडा पाण्यात असाच राहू द्या. नंतर पाणी थंड झाल्यावर कपडा बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवा.
३) मायक्रोवेव्हची घ्या मदत
स्वयंपाकघरातील कपडा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मायक्रोवेव्हचीही मदत घेऊ शकता. यासाठी कपडा व्हिनेगर आणि पाण्यात काही मिनिटे भिजवून ठेवा नंतर तो मायक्रोवेव्हमध्ये १० ते १५ सेकंदांसाठी उच्च आचेवर ठेवा.
कपडा मायक्रोवेव्हिंग ठेवण्यापूर्वी तो व्हिनेगरमध्ये भिजवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तो लिक्विड डिश वॉशने धुवून नंतर मायक्रोवेव्हमध्ये ठेवू शकता.
‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी
१) स्वयंपाकघरात फक्त मायक्रोफायबर, कॉटन आणि लिननचा कपडा वापरा
२) आठवड्यातून एकदा स्वयंपाकघरातील कपडा धुवा.
३) दरवर्षी स्वयंपाकघरातील कपडा बदलत रहा.