बनवायला तर मी पंचपक्वान्न बनवेन पण भांडी घासायला कंटाळा येतो… जवळपास सर्वच घरगुती मास्टरशेफच्या तोंडी हे वाक्य ठरलेलं असतं. जेवण बनवताना कितीही नॉनस्टिक पॅन किंवा कढई घेतल्या तरी अनेकदा नजरचुकीने गॅस जास्त वेळ सुरु राहतो किंवा एखादा पदार्थाच अधिक वेळ शिजायला लागत असल्याने भांड्याचा तळ करपून काळाकुट्ट होतो. अशावेळी भांडी घासणाऱ्यांच्या डोक्याला ताप होतो हे काही वेगळं सांगायला नको. साध्या साबणाने जर तुम्ही का करपलेला थर वेगळा करायचा प्रयत्न करत असाल तर हात दुखायला लागतो. इतके प्रयत्न करूनही कुठे भांड्यांच्या कड्याला कुठे तळाला थोडा करपट पणा शिल्लक राहतोच. याच समस्येवर आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे कमी वेळ, कमीत कमी खर्च आणि शून्य मेहनत करून तुम्ही ही करपलेली भांडी नव्यासारखी उजळवून टाकू शकाल.
करपलेली कढई स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय
- करपलेल्या भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका. दोन चमचे लिंबाचा रस आणि २ कप गरम पाणी टाका. यानंतर भांडी घासायच्या काथ्याने अगदी सहज हा करपट थर घासून बाजूला करता येईल.
- एक कच्चा लिंबू घेऊन करपलेल्या भांड्याला चोळून मग त्यात गरम पाणी टाका. लिंबाच्या सिट्रिक ऍसिडने करपट थर निघण्यास मदत होते.
- करपलेल्या भांड्यात मीठ आणि पाणी टाकून ते चांगले उकळवून काही वेळ तसेच ठेवा नंतर यात थोरा साबण लावून हलक्या हाताने घासून स्वच्छ करा.
- करपलेल्या भांड्यात पाणी घेऊन त्यात कांद्याचे छोटे तुकडे टाकून उकळून घ्या, काहीवेळातच करपट थर व कांद्याचे तुकडे पाण्यावर तरंगायला लागतील.
- टोमॅटो सॉस/ केचप वापरून सुद्धा तुम्ही भांडी स्वच्छ करू शकता. सुरुवातीला थोडा सॉस लावून ठेवा आणि काही वेळाने त्यात थोडे गरम पाणी टाऊन घासून घ्या.
Kitchen Tips: करवंटीला चिकटून खोबरं जातंय वाया? ओला नारळ खवताना करा ही ट्रिक
- व्हिनेगर व बेकिंग सोड्याचे मिश्रण कठीण डाग सुद्धा सहज काढू शकतात. शक्यतो तारेचा काथ्या वापरू नका त्याऐवजी स्क्रबने भांडी स्वच्छ करा.
- कोकम मधील आम्लसत्व सुद्धा करपट थर काढून टाकण्यास मदत करतात.
- सोडायुक्त पेय भांड्यात घेऊन अगदी मंद आचेवर उलकून घ्या यामुळे भांडी स्वच्छ होण्यास मदत होते, मात्र गॅसची आच अधिक करु नका अन्यथा या पेल्यातील साखर करपून भांडी अधिक काळी पडतील.
- साखर किंवा मीठ नैसर्गिक स्क्रबचे काम करते त्यामुळे थोड्यावेळ करपलेल्या भांड्यावर खड्याचे मीठ किंवा जाड साखर पसरवून ठेवा व मग कोमट पाणी घालून भांडी स्वच्छ करा.
Smart Kitchen Tips: दुधावर घट्ट साय हवी तर या 5 सोप्या टिप्स नक्की वापरा
तुम्हाला जर अतिवापरामुळे तवा- कढई नॉनस्टिक उरले नसल्याचे वाटत असेल तर आपण पॅनमध्ये दोन चमचे मीठ घालून सूर्यफूल तेल घाला, पॅन पूर्णपणे गरम करून मग उरलेले तेल काढून टाका व पेपर टॉवेलने पॅनचा पृष्ठभाग पुसून घ्या. यामुळे पॅन किंवा कढई अधिक दिवस टिकते.