Kitchen Gas Cylinder Hack: स्वयंपाकघरात वेळेची सतत धावपळ सुरूच असते. सकाळी टिफिन तयार करताना किंवा दुपारी जेवणाचा बेत करताना अचानक गॅस संपला तर… अगदी जीव घाबरतो. जेवण अर्धवट, घरात कोलाहल आणि मग सिलिंडर बदला, डिलिव्हरीवाल्याला कॉल करा अशा अनेक गोष्टींचा ‘ताप’ होऊ लागतो. पण, या सगळ्या त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टींना आता ‘गुड बाय’ म्हणायची वेळ आली आहे. कारण- एका हुशार गृहिणीने दाखवलेला एक छोटासा किचन जुगाड सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे आणि विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला काहीच खरेदी करावं लागणार नाही.
स्वयंपाक चालू असताना अचानक गॅस संपला… तवा तापलेला, भाजी अर्धवट आणि घरभर धावपळ सुरू… अशा अनेक प्रसंगी अनेक गृहिणींचं ‘डोकं फिरतं’ आणि चिडचिड होऊ लागते. कारण- घर चालवताना वेळ आणि गॅस अशा दोन्ही गोष्टी अमूल्य असतात. पण कल्पना करा, जर तुम्हाला आधीच कळलं की गॅस संपणार आहे… आणि त्यासाठी कोणतंही उपकरण वापरावं लागणार नाही, फक्त एक ओला कपडा लागेल. होय, हे खरं आहे. एका स्मार्ट गृहिणीने दाखवलेला असा भन्नाट जुगाड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे गॅस अचानक संपण्याची चिंता मिटणार आहे. ना गॅस मापकाची गरज, ना अंदाजाने चालणं – आता एक छोटा ट्रिक आणि मोठा फायदा!
या व्हिडीओमध्ये गृहिणीने एक फारच साधा पण परिणामकारक उपाय दाखवला आहे. फक्त एक ओला कपडा आणि सिलिंडर – एवढंच साहित्य लागणार आहे. ती म्हणते, “गॅस संपला की टेन्शन घेणं आता पुरे; आधीच त्याची माहिती मिळाली तर बेस्ट ना?”
या ट्रिकसाठी फक्त एक छोटा टॉवेल किंवा कुठलाही सुती कपडा घ्या. त्याला पाण्यात बुडवून पूर्ण ओलसर करा. मग तो कपडा सिलिंडरवरून फिरवा – म्हणजे संपूर्ण सिलिंडर त्याने नीट पुसून घ्या आणि मग काय? जादू पाहा! काही वेळात तुम्हाला लक्षात येईल की सिलिंडरचा काही भाग लवकर कोरडा होतोय, तर काही भाग अजूनही ओलसर आहे.
मग याचं नेमकं लॉजिक काय आहे?
सिंपल फंडा! ज्या भागात सिलिंडरमध्ये गॅस संपलेला असतो, तो भाग उष्णतेने भरलेला असतो, त्यामुळे ओले पाणी लगेचच बाष्परूप होऊन कपडा कोरडा होतो आणि जिथे अजून गॅस आहे, तो भाग थंड असतो – त्यामुळे कपडा काही वेळ ओलसरच राहतो. यामुळे तुम्हाला सहज लक्षात येतं की सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे आणि तो किती काळ चालेल याचा अंदाज येतो. म्हणजे आता अनपेक्षितपणे गॅस संपण्याचं टेन्शनच नाही!
Rk’s kitchen Marathi या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
येथे पाहा व्हिडीओ
टीप : अर्थात, हा उपाय केवळ तात्पुरता अंदाज घेण्यासाठी आहे. परंतु, गॅस पूर्णपणे संपण्यापूर्वी नवीन सिलिंडर उपलब्ध ठेवणं केव्हाही सुरक्षित!
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)