स्वयंपाकात मीठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव, सुंगध येत नाही. मीठ नसेल तर कोणताही पदार्थ बेचव लागतो. पण अनेकदा भाजी किंवा डाळी बनवताना तुमच्या हातून चुकून जास्त मीठ पडतं, कधी कधी लक्ष नसल्यामुळे तुम्ही एखाद्या पदार्थांमध्ये दोन वेळा मीठ टाकता. ज्यामुळे भाजी प्रमाणापेक्षा जास्तच खारट होते आणि ती खाण्यायोग्यही राहत नाही. अशावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. पण आता काळजी करु नका. खाली दिलेले तीन उपाय फॉलो करुन तुम्ही खारट भाजी देखील खूप चविष्ट बनवू शकता, हे उपाय कोणते जाणून घेऊ….

भाजीमध्ये मीठ जास्त पडल्यास काय करावे?

१) उकडलेले बटाटे टाका

भाजीमध्ये मीठ जास्त पडले तर त्यात थोडे उकडलेले बटाटे टाका. यामुळे बटाटे भाजीतील मीठ शोषून घेईल. उकडलेल्या बटाट्यामध्ये जास्त स्टार्च असते आणि ते मीठ जलद शोषण्यास सुरवात करते. म्हणून एक उकडलेला बटाटा घ्या, त्याचे बारीक तुकडे करा आणि ते भाजी किंवा भाजीच्या ग्रेव्हीमध्ये टाका. कच्चा बटाटा वापरला असेल तर तो भाजीत २० मिनिटे शिजू द्या.

२) तूप आणि थोडे पाणी टाका

एखादी भाजी खूप जास्त खारट नसेल तर त्यात तुम्ही १ चमचा तूप आणि थोडे पाणी मिक्स करा. मग ती पुन्हा उकळी येईपर्यंत शिजवा. यामुळे भाजीतील मीठाची चव कमी होईल आणि तुम्ही ती आरामात खाऊ शकाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३) पिठाचा गोळा टाका

भाजी अथवा डाळ खारट झाली असे तर त्यात मळलेल्या गव्हाच्या पिठाचे गोळे टाकू शकता, पिठाचे हे गोळे मीठ शोषून घेईल. यासाठी गोळे टाकल्यानंतर भाजी किंवा डाळ थोडा वेळ उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करा. मीठाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुमची ग्रेव्ही अथवा डाळ पुन्हा खाण्यासाठी योग्य होईल.

४) ब्रेड वापरा

ब्रेड कोणताही द्रव पदार्थ पटकन शोषून घेते. जेव्हा भाजीमध्ये मीठ जास्त झाले असेल तेव्हा त्यात ब्रेड टाका, ज्यामुळे मीठ शोषून घेतले जाईल. यामुळे भाजी जास्त घट्ट झाली तर त्यात पाणी घालून ती पुन्हा उकळवा. या पद्धतींने तुम्ही भाजीतील मीठाचे प्रमाण कमी करु शकता.