How to Avoid Heart Attack Naturally: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅकचा धोका झपाट्याने वाढताना दिसतो आहे. पूर्वी ही समस्या वयस्कर लोकांमध्ये दिसत होती, पण आता २५ ते ४० वयोगटातील तरुणांमध्येही हा धोका वेगाने वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरात तरुणांमध्ये हार्ट अटॅकच्या घटना चिंताजनक प्रमाणात वाढल्या आहेत. डॉक्टर सांगतात ताणतणाव, चुकीची आहारशैली आणि निष्क्रिय जीवनशैली हे यामागचे मुख्य कारण आहे. पण चांगली बातमी अशी की, काही साध्या सवयी अंगीकारल्यास तुम्ही अजीवन हृदयविकाराच्या संकटापासून दूर राहू शकता.

या ५ गोष्टी रोज केल्या तर आयुष्यभर हार्ट अटॅकचा धोका होईल कमी

१. शरीर ठेवा सदैव ‘अॅक्टिव’

इंडियन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीचे महासचिव डॉ. सी. एम. नागेश सांगतात, “दररोज किमान ३० मिनिटं शरीर हालचालीत ठेवलं तर हृदयावरचं ओझं कमी होतं आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो.” वेगात चालणं, सायकल चालवणं, पोहणं किंवा जेवणानंतर साधी चालही फार उपयोगी ठरते. लिफ्टऐवजी पायऱ्या चढा, रोज थोडं चालण्याचं ठरवा. या छोट्या सवयी मोठं काम करतात.

२. आहार ठेवा ‘हार्ट-फ्रेंडली’

डॉ. नागेश सांगतात, “फळं, भाज्या, संपूर्ण धान्यं आणि ऑलिव्ह तेल यांचा समावेश असलेला आहार हृदयासाठी सर्वोत्तम आहे.” तर दुसरीकडे पॅकेज्ड फूड, ट्रान्सफॅट आणि जास्त साखर असलेले पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवतात, त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. थोडक्यात जेवणात जितकं नैसर्गिक, तितकं हृदय निरोगी

३. धूम्रपान सोडा आणि मद्यापासून दूर राहा

सिगारेटचा धूर केवळ फुप्फुसं नाही तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांनाही नुकसान पोहोचवतो. तो रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतो आणि रक्त घट्ट बनवतो, त्यामुळे थक्का (clot) तयार होतो आणि अचानक हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अत्याधिक मद्यपानही तितकंच धोकादायक आहे. ते रक्तदाब वाढवतं आणि हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करतं.

४. शरीर ठेवा ‘हायड्रेटेड’

अनेकांना वाटतं पाणी कमी प्यायल्याने काही फरक पडत नाही. पण डॉक्टर सांगतात, “डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होतं आणि थक्का तयार होण्याचा धोका वाढतो.” दररोज पुरेसं पाणी प्या; विशेषतः सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणं रक्तप्रवाह सुरळीत ठेवतं.

५. पूर्ण झोप घ्या, ताण ठेवा दूर

रात्रीची झोप पूर्ण न घेतल्यास ब्लड प्रेशर वाढतं आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. दररोज ७-८ तासांची शांत झोप घ्या आणि मानसिक ताणावर नियंत्रण ठेवा. मेडिटेशन, प्राणायाम यांसारख्या सवयी मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स ठेवतात.

शेवटी डॉक्टरांचा सल्ला
“ही पाच कामं रोज केलीत तर हार्ट अटॅक तुम्हाला आयुष्यभर स्पर्शही करणार नाही!” डॉक्टरांच्या या सल्ल्याला थोडं गांभीर्याने घ्या… कारण मजबूत हृदय हेच खरं सोनं आहे.