Liver Cancer Prevention Tips: लिव्हर (यकृत) कॅन्सर हा जगभरात झपाट्याने वाढणारा आजार मानला जातो. अनेकांना वाटतं की, तो फक्त आनुवंशिक कारणांमुळे किंवा औषधांच्या दुष्परिणामांमुळे होतो. पण, खरा धोका आपल्या रोजच्या सवयींमध्ये लपलेला आहे. लिव्हर म्हणजे शरीराचा सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. पचनासाठी पित्त तयार करतं आणि प्रथिनं निर्माण करतं. पण, हाच अवयव नकळत होणाऱ्या चुकीच्या सवयींमुळे हळूहळू खराब होत जातो आणि अखेरीस कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराला आमंत्रण मिळतं.
तज्ज्ञांचा इशारा गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी नुकतंच सांगितलं की, काही सामान्य वाटणाऱ्या चार सवयींमुळे यकृतावर इतका ताण येतो की, पुढे त्याचं रूपांतर थेट यकृताच्या कर्करोगामध्ये होऊ शकतं. धक्कादायक म्हणजे या सवयी अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत आणि लोकांना त्याची अजिबात जाणीवही नसते.
धोकादायक सवयी कोणत्या?
१. प्रोसेस्ड मांस
बेकन, सॉसेज, हॉट डॉग यांसारख्या मांसाहारी पदार्थांमध्ये असलेले नायट्रेट्स आणि रसायने यकृतामध्ये साचतात. त्यामुळे सूज येते आणि पेशींमध्ये हळूहळू बदल होऊन कर्करोगाचा धोका वाढतो.
२. मद्यपान
बीयर असो वा वाइन, कोणतंही अल्कोहोल नियमित घेतल्यास यकृतात चरबी साचते, जखमा होतात आणि ‘सिरॉसिस’सारखी स्थिती निर्माण होते. त्याचा परिणाम पुढे कर्करोगामध्ये होऊ शकतो.
३. साखरयुक्त पेयं
कोल्ड्रिंक, पॅक ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स यांमधील जास्त फ्रॅक्टोज यकृतात चरबी वाढवतात. त्यामुळे ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर’ होतो, जो आजकाल यकृताच्या कर्करोगाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतोय.
४. तळलेले पदार्थ
फ्रेंच फ्राईज, चिप्स, फ्राईड चिकन यांसारखे पदार्थ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करतात. त्यामुळे यकृतामध्ये दीर्घकालीन सूज येऊन पेशींचं नुकसान होतं.
यकृताच्या कर्करोगाची लक्षणं
या आजाराची सुरुवातीची लक्षणं बहुतांश वेळा दिसत नाहीत. पण पुढे जाताना पोटात उजव्या बाजूला वेदना, सूज, तसेच थकवा, भूक न लागणं, अचानक वजन कमी होणं, पिवळे डोळे व पिवळी त्वचा, अशी कावीळसदृश चिन्हं दिसू शकतात.
काय कराल बचावासाठी?
- तळलेले व प्रोसेस्ड पदार्थ टाळा, ताजं अन्न व फळं-भाज्या खा.
- मद्यपान कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा.
- साखरयुक्त पेयांऐवजी पाणी, हर्बल टी घ्या.
- नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवा.
- तणाव कमी करण्यासाठी ध्यान-योग करा.
लक्षात ठेवा, यकृत एकदा पूर्णपणे खराब झालं की, त्याचं पुनरुज्जीवन कठीण असतं. त्यामुळे वेळेवर सावध राहणं हाच सर्वोत्तम उपाय आहे.