Signs of Lung Cancer in Hands and Feet: कॅन्सर हा एक असा जीवघेणा आजार आहे, जो हळूहळू शरीरात पसरतो आणि बऱ्याच वेळा त्याचं निदान उशिरा होतं. त्याचे उपचारही सोपे नसतात. त्यातही फुप्फुसाचा कॅन्सर (Lung Cancer) हा सर्वात घातक प्रकार मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, या कॅन्सरची काही सुरुवातीची लक्षणं तुमच्या हाता-पायांवर दिसू शकतात? होय, शरीरातील ही बाह्य चिन्हं तुमच्या शरीराच्या आत काय चाललंय ते सांगत असतात आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती जीवावर बेतू शकते.
फुप्फुसाचा कॅन्सर म्हणजे काय?
फुप्फुसाचा कॅन्सर हा एक असा आजार आहे, ज्यात फुप्फुसातील पेशी अनियंत्रितरीत्या वाढू लागतात. हा आजार जगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं एक प्रमुख कारण आहे. २०२० मध्ये यामुळे जवळपास १८ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, प्रत्येक १७ पुरुषांपैकी १ आणि १८ महिलांपैकी एका महिलेला आयुष्यात एकदा तरी फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. धूम्रपान करणारे आणि न करणारे दोघेही याच्या जोखमीपासून दूर नाहीत.
हात-पाय सांगतायत धोका! ‘ही’ ५ लक्षणं म्हणजे फुप्फुसाच्या कॅन्सरचा इशारा
१. बोटांच्या टोकांना फुगलेपणा किंवा गोलसर आकार
हातांच्या आणि पायांच्या बोटांमध्ये ‘डिजिटल क्लबिंग’ नावाची स्थिती दिसू शकते. यात बोटांचे टोक फुगलेले, गोलसर किंवा बल्बसारखे दिसू लागतात. नखं मऊ होतात आणि टोकाकडे वाकतात. हे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण घटल्यामुळे होतं, जे फुप्फुसाच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात.
२. हाता-पायाला सूज किंवा वेदना
फुप्फुसाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या काही रुग्णांना हातांमध्ये आणि पायांमध्ये वेदना किंवा सूज जाणवते. हे ट्यूमरमुळे नसांवर किंवा रक्तवाहिन्यांवर दडपण आल्याने घडू शकतं. काही वेळा लसिकेच्या प्रवाहात अडथळा आल्यामुळे द्रव साचतो आणि त्यामुळे हात-पाय सुजतात.
३. नखांच्या रंगात बदल
जर तुमच्या हातां-पायांच्या नखांचा रंग अचानक निळा, करडा किंवा जांभळट झाला असेल तर तेही गंभीर लक्षण आहे. फुप्फुसाचा कॅन्सर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी करतो, ज्यामुळे रक्तातील ऑक्सिजन कमी होतो आणि नखांचा रंग बदलतो.
४. एडिमा
फुप्फुसाचा कॅन्सर रक्तप्रवाह किंवा लसिका प्रवाहावर परिणाम करत असल्यास शरीरात द्रव साचतो, त्यामुळे हात-पाय फुगतात, जड वाटतात आणि त्वचेवर ताण जाणवतो. हे अनेकदा छातीतील लिम्फ नोड्सपर्यंत पसरल्याचं लक्षण असतं.
५. हात-पाय सुन्न होणे किंवा झिणझिण्या येणे
हात-पाय सुन्न होणे, झिणझिण्या जाणवणे किंवा संवेदनांमध्ये बदल होणे हेही धोकादायक चिन्ह आहे. हे फुप्फुसाचा कॅन्सर नसांवर किंवा पाठीच्या कण्यावर दबाव आणतो म्हणून होतं. या स्थितीला परिधीय न्युरोपॅथी म्हणतात आणि ही अवस्था कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरल्याचं द्योतक असते.
दुर्लक्ष केलं तर धोका वाढतो!
या चिन्हांकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात, पण हाच निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. जर तुम्हाला हाता-पायांवर अशी लक्षणं दिसत असतील; सूज, रंगबदल, वेदना किंवा झिणझिण्या तर लगेच वैद्यकीय तपासणी करणे अत्यावश्यक आहे.
फुप्फुसाचा कॅन्सर जितक्या लवकर ओळखला जाईल, तितकी उपचारांची शक्यता वाढते. शरीर देत असलेल्या या सिग्नल्सकडे लक्ष द्या, ते तुमचा जीव वाचवू शकतात.
