How To Store Garlic During Monsoon: पावसाळा जरी वातावरणात गारवा घेऊन येत असला, तरी स्वयंपाकघरातील काही गोष्टींसाठी मात्र तो डोकेदुखी ठरतो. विशेषतः लसूण, जो दररोजच्या जेवणात चव वाढवण्यासाठी अत्यावश्यक असतो, तोच या आर्द्र हवामानात सहज बुरशीच्या विळख्यात सापडतो. पावसाळा सुरू झालाय आणि हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. स्वयंपाकघरात ठेवलेला लसूण या ओलाव्यामुळे लवकर सडतो, त्यावर बुरशी येते आणि त्याचा वासही खराब येतो. खवय्यांना माहिती आहे की, लसूण हा केवळ पदार्थाची चव वाढवतो असं नाही, तर तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो. पण, अनेकांना एकच त्रास होत असतो, तो म्हणजे पावसाळ्यात लसूण टिकत नाही.

अनेक घरांमध्ये ही सामान्य तक्रार असते की, पावसात लसूण लवकर कुजतो, सडतो किंवा त्यावर बुरशी येते. मात्र, काळजीचं कारण नाही. योग्य पद्धती वापरल्या तर हा लसूण फक्त ताजा राहतो असं नाही, तर महिनोनमहिने खराबही होत नाही. चला तर मग, जाणून घेऊया लसणाचं योग्य स्टोरेज कसं करायचं, जे तुमच्या किचनचं टेन्शनही कमी करेल आणि लसणाचा ताजेपणाही कायम ठेवेल…

लसूण साठवण्याचे ‘हे’ आहेत खास उपाय:

१. कोरड्या व थंड जागी ठेवा

लसूण साठवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की तो कोरड्या आणि थंड जागी ठेवावा. आर्द्रता म्हणजे बुरशीचं आमंत्रण.

२. मेश किंवा पेपर बॅगचा वापर करा

प्लास्टिक बॅगमध्ये लसूण ठेवू नका. त्याऐवजी मेश किंवा पेपर बॅग वापरा, ज्यामुळे हवा खेळती राहते आणि लसूण ताजा राहतो.

३. काचेच्या बरणीत ठेवा पण झाकून ठेऊ नका!

लसूण काचेच्या जारमध्ये ठेवून त्याचे झाकण थोडं उघडं ठेवा, त्यामुळे बाष्प साचणार नाही आणि बुरशीही टळेल.

४. फ्रिजमध्ये ठेवा पण सोलून!

लसूण सोलून एअरटाइट डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. वापरण्यासही सोयीस्कर आणि टिकाऊ पद्धत.

५. पेस्ट बनवा आणि थोडं तेल/मीठ मिसळा

लसूण सोलून पेस्ट बनवा आणि थोडं मीठ किंवा तेल टाका. एअरटाइट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. महिन्यांपर्यंत टिकेल.

६. तेलात बुडवून ठेवा

लसूण सोलून काचेच्या बरणीत ठेवा आणि त्यावर ऑलिव्ह ऑइल ओता. बुरशी येण्याचा प्रश्नच नाही.

थोडक्यात :
लसूण साठवणं हे रॉकेट सायन्स नाही, फक्त योग्य पद्धती माहीत असायला हव्यात. वर दिलेले कोणतेही एक-दोन उपाय वापरले, तरी तुम्ही लसूण महिन्यांपर्यंत ताजा ठेवू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)