Morning Habits that Damage Kidneys: सकाळ म्हणजे नवा दिवस, नवी ऊर्जा. पण, हीच सकाळ तुमच्या आयुष्यात गंभीर धोका निर्माण करू शकते, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना? पण, असं होऊ शकतं. कारण- उठल्यावर काही अगदी साध्या वाटणाऱ्या सवयी तुमच्या किडनीला (मूत्रपिंडाला) हळूहळू कमकुवत करीत असतात. दिवसभरात कितीही काळजी घेतली तरी दिवसाची सुरुवात चुकीने झाली, तर आरोग्याचं संतुलन बिघडतं. डॉक्टरांच्या मते, अशा सकाळच्या सात सवयी आहेत, ज्या नकळत तुमच्या किडनीवर ताण निर्माण करतात.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी योगाव्यतिरिक्त जीवनशैलीत काही बदल करणेदेखील आवश्यक आहे, ज्याचा वापर करून तुम्हाला विशेष फायदे मिळू शकतात. घरी शिजवलेले अन्न खा आणि बाहेरचे अन्न खाणे टाळा. आपल्या आहारात अधिकाधिक फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. त्याशिवाय अशा काही सवयी आहेत, की ज्यांमुळे आपली किडनी खराब होऊ शकते, चला जाणून घेऊया…
तुमच्या ‘या’ ७ सवयी वेळीच बदला; नाहीतर कधीही होऊ शकते किडनी खराब
१. सकाळी पाणी न पिण्याची सवय
रात्री झोपेत शरीर डिहायड्रेट होतं. सकाळी पाणी न घेतल्यास किडनीला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे शरीरात विषारी द्रव्यं साचतात आणि किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.
२. लघवी रोखून ठेवणे
सकाळी घाई किंवा आळसामुळे अनेकदा आपण लघवी दाबून ठेवतो. ही सवय मूत्राशय आणि मूत्रपिंडावर ताण निर्माण करते. दीर्घकाळ असं केल्यास संसर्ग आणि स्टोनची शक्यता वाढते.
३. जास्त कॅफिन घेणे
सकाळी उठताच कॉफी किंवा चहा घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. पण, याचं अति सेवन शरीर डिहायड्रेट करतं आणि त्यामुळे किडनीच्या फिल्टरेशनवर वाईट परिणाम होतो.
४. जास्त मीठ असलेला नाश्ता
प्रोसेस्ड किंवा जास्त मीठ असलेला नाश्ता सकाळी घेतल्यास किडनीवर प्रचंड ताण येतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि दीर्घकाळात किडनीची कार्यक्षमता घटते.
५. नाश्ता टाळणे
सकाळचा नाश्ता टाळल्याने शरीरात नंतर रक्तातील साखर अचानक वाढते. त्यामुळे दीर्घकाळात किडनीवर परिणाम होऊन कार्यक्षमतेत बिघाड होऊ शकतो.
६. रिकाम्या पोटी पेनकिलर घेणे
काही लोकांना डोकेदुखी किंवा अंगदुखीवर सकाळी उठताच गोळ्या घेण्याची सवय असते. पण, ही औषधं रिकाम्या पोटी घेतल्याने किडनीला अनावश्यक रासायनिक ताण सहन करावा लागतो.
७. सकाळी व्यायाम न करणे
सकाळी हलकासा व्यायाम, चालणे किंवा योग टाळल्यास शरीर सुस्त राहतं. त्यामुळे रक्तदाब आणि साखर वाढते, जे किडनीसाठी धोकादायक आहे.
सकाळी केलेल्या या सात चुका लहान वाटल्या तरी त्या हळूहळू किडनीचं आरोग्य बिघडवतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात योग्य सवयींनी करा. भरपूर पाणी प्या, लघवी दाबू नका, प्रमाणात चहा-कॉफी घ्या, पौष्टिक नाश्ता करा आणि थोडा व्यायाम नक्की करा.
लक्षात ठेवा, तुमची किडनी शांत असली तरी ती तुमच्या आयुष्याचं इंजिन आहे. तिच्यावर जास्त ताण पडणार नाही याची दक्षता घेतली, तर आयुष्य खरंच सुखकर होईल.