Mouth Cancer Symptoms: तोंडाचा कर्करोग हा जीवघेणा आजार असला तरी, वेळेत ओळखला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण दुर्दैवाने, अनेक लोक सुरुवातीच्या खूणांकडे दुर्लक्ष करतात आणि तेच पुढे जीवावर बेततं. तोंडात वारंवार होणारे फोड, न जाणाऱ्या जखमा किंवा लाल-पांढरे डाग हे अनेकांना किरकोळ त्रास वाटतात. पण डॉक्टर सांगतात, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर पुढे जीवावरही बेतू शकतं; कारण हे फक्त सामान्य फोड नसून तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात असू शकते.

तोंडाचा कर्करोग म्हणजे काय?

तोंडाच्या आतल्या भागातील किंवा ओठांवरील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्या तर त्यातून कर्करोग निर्माण होतो. वैद्यकीयतज्ज्ञ सांगतात की, हा आजार बहुधा स्क्वॅमस सेल्समध्ये सुरू होतो, म्हणजे ओठांच्या आणि तोंडाच्या आतील थरात असलेल्या बारीक पेशींमध्ये. या पेशींच्या डीएनएमध्ये झालेल्या लहानसहान बदलांमुळे त्या अनियंत्रित वाढ घेतात आणि त्यातून निर्माण होतो तोंडाचा कॅन्सर.

तोंडाचा कॅन्सर कुठे पसरतो?

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) च्या मते, तोंडाचा कॅन्सर जीभ, ओठ, हिरड्या, गालांच्या आतील त्वचा या भागांमध्ये विकसित होऊ शकतो. काही वेळा तो लाळग्रंथी, टॉन्सिल किंवा घशाच्या आतील भागातही पसरू शकतो. म्हणजे तुमच्या तोंडापासून घशापर्यंतचा कोणताही भाग या आजाराच्या विळख्यात येऊ शकतो.

ओळखा हे धोकादायक संकेत:

  • तोंडात किंवा ओठांवर झालेल्या जखमा ज्या आठवड्यानंतरही बऱ्या होत नाहीत.
  • दात सैल होणे किंवा दात उपटल्यावर जखम न बरी होणं.
  • तोंडात किंवा जिभेत सतत सुन्नपणा जाणवणं.
  • जिभेवर किंवा हिरड्यांवर लाल किंवा पांढरे ठिपके दिसणं.
  • गिळताना किंवा बोलताना वेदना जाणवणं.

डॉक्टरांकडे जाणं का आवश्यक आहे?

अनेकदा लोक ही लक्षणं “साधे फोड” समजून दुर्लक्ष करतात. पण एनएचएस सांगते, लवकर निदान झाल्यास तोंडाच्या कॅन्सरमधून वाचण्याची शक्यता ५०% वरून थेट ९०% पर्यंत वाढते, म्हणून अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तोंडाचा कर्करोग टाळण्यासाठी काय कराल?

  • तंबाखूचा वापर तात्काळ बंद करा, मग तो धूम्रपान असो किंवा गुटखा/चघळणाऱ्या स्वरूपात असो
  • दारूचे प्रमाण कमी करा
  • अति सूर्यप्रकाशापासून ओठांचं रक्षण करा
  • आणि सर्वात महत्त्वाचं – नियमित दंत तपासणी करून घ्या.

तोंडातले छोटेसे बदल कधी मोठा इशारा ठरू शकतात, म्हणूनच आरशात दिसणाऱ्या छोट्या जखमेच्या मागे दडलेला धोका ओळखा. वेळेत सावध राहिलात तर कॅन्सरपासून आयुष्यभरासाठी वाचू शकता!