भारत आपला हा देश विविध जाती-धर्मानी एकवटलेला देश आहे. या भारत देशात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे येथे विविधतेत एकता पाहायला मिळते. अशातच यावर्षी १० ऑगस्टपासून पवित्र अशा मोहरमला सुरुवात झाली आहे. इस्लाममध्ये मोहरम हा दुःखाचा महिना मानला जातो. मुस्लिम समाज विशेषत: शिया समुदायाचे लोक या महिन्याच्या नवव्या किंवा दहाव्या दिवशी रोजा ठेवतात. मोहरम म्हणजे इस्लामी कॅलेंडरमधील पहिला महिना होय. इस्लामचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसैन हे करबलाच्या मैदानावर याच महिन्यामध्ये शहिद झाले होते. त्यामुळे त्यांच्या आठवणीमध्ये हा सण साजरा केला जातो.

इस्लामिक कॅलेंडर-

हिजरी कॅलेंडरमध्ये चंद्राच्या आधारे तारखा निश्चित केल्या जातात. ग्रेगोरियन कॅलेंडर आणि इस्लामिक कॅलेंडरमध्ये खूपच फरक आहे. त्यामुळे दरवर्षी मोहरमची तारीखसुद्धा मागेपुढे होत असते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये ३६५ नव्हे तर फक्त ३५५ दिवस असतात.

इतिहास-

हजरत मोहम्मद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा यांची हसन आणि हुसेन ही दोन्ही मुले होती. पैगंबरांचे हे दोन्ही नातू करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात ‘तारीख-ए-इस्लाम’ हे ऐतिहासिक युद्ध झाले होते. इस्लाममध्ये त्यांचा प्रमुख नेता अर्थात खलिफा निवडण्याचा रिवाज आहे. मोहम्मद पैंगबरांनंतर असे चार खलिफा निवडले गेले. परंतु, काही वर्षांनी उमैया वंशांचे संस्थापक, इस्लाम धर्मातील पाचवे खलिफा असलेल्या अमीर मुआविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजीदने स्वत:ला खलिफा घोषित केले. परंतु, इस्लाममध्ये ‘बादशाही’ची संकल्पना नव्हती. शिवाय यजीद एक क्रूर शासकही होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. त्यामुळे यजीदला खलिफा मानण्यास पैगंबरांच्या नातवंडांसह अनेकांनी नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हुसैनने आपल्याला खलिफा मानण्यास नकार दिल्यास त्याचे शीर कलम करण्याचे फर्मान यजीदने सोडले. हिजरीच्या महिन्यातील एका रात्री हुसैनला राजभवनात बोलावून यजीदचं हे फर्मान सुनावण्यात आलं. परंतु, हे फर्मान नाकारून हुसैन मक्केच्या दिशेने जायला निघाले. मात्र संतप्त यजीदने आपले सैनिक हुसैनना मारण्यासाठी पाठवले. हुसैन आपल्या परिवार व मित्रांसोबत करबला इथे पोहोचले असताना यजीदच्या सैन्याने त्यांना गाठले. हुसैन यांनी या सैन्याला इस्लाममधील शांतताप्रिय सिद्धांत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला खरा परंतु, सैन्यावर त्याचा परिणाम झाला नाही. अखेर हे युद्ध करबलामध्ये सुरू झाले. हुसैन यांचे ७२ अनुयायी या लढाईत मारले गेले. या युद्धभूमीत केवळ हुसैन आणि त्यांचा ६ महिन्यांचा पुत्र अली असगर उरले होते. तहानेने व्याकूळ झालेल्या आपल्या पुत्रासाठी हुसैन यांनी सैन्याकडे पाण्याची मागणी केली. परंतु, पाणी देण्याऐवजी या चिमुकल्याचा बाण मारून जीव घेण्यात आला. या युद्धात हुसैन यांनाही मारण्यात आले. या नरसंहारानंतर मुस्लिम बांधव या महिन्याकडे ‘मातम का महिना’ म्हणून पाहतात. त्यामुळे हा महिना मुस्लीम बांधव दु:ख म्हणून साजरा करतात. आणि हसन हुसैन यांची आठवण काढतात.