..तर पृथ्वीचा ऱ्हास अटळ!

‘अर्थ डे नेटवर्क’चे दास यांनी व्यक्त केली भीती

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

हवामान बदलाचा परिणाम; ‘अर्थ डे नेटवर्कचे दास यांनी व्यक्त केली भीती

हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम दिवसेंदिवस गडद होत असून सुंदरबनमधील खोडामाडासारखे आयलंड नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. प्रतिकुलतेवर लवकर मात केली नाही तर इतरही आयलंड आणि पृथ्वीचा ऱ्हास अटळ आहे, अशी भीती  ‘अर्थ डे नेटवर्क’चे भारतातील प्रतिनिधी नवोनील दास यांनी व्यक्त केली.

‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांना हात घालत भविष्यातील धोके दर्शविले आणि ते टाळायचे असतील तर ‘अर्थ डे नेटवर्क’सोबतच लोकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले.

हवामान बदलाचे परिणाम स्पष्टपणे जाणवू लागले असून स्वच्छ पर्यावरणाची गरज अधारेखित होऊ लागली आहे.‘अर्थ डे नेटवर्क’च्या माध्यमातून पर्यावरण चळवळीचे जगभरातील प्रमुख आणि कार्यकर्ते परस्परांच्या संपर्कात आहेत. विचारांची देवाणघेवाण सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडून येत आहेत. हे आंतरराष्ट्रीय जाळे १९२ देशांतील तब्बल २२ हजार संघटनांपर्यंत पसरलेले आहे. अर्थ डे नेटवर्कने अलीकडेच अमेरिकेच्या मदतीने पाच देशांची बैठक आयोजित केली. यामध्ये परिसर, घर, समाज हिरवागार करण्यासाठी अभिनव धोरणात्मक संकल्पना मांडण्यात आल्या. यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ आणि श्रीलंका येथून सुमारे ७० युवक सहभागी झाले होते. हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम होत असतानासुद्धा त्याविषयी साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. लहान प्रयोगांच्या माध्यमातून मुलांना पर्यावरणाचे ज्ञान देता येऊ शकते, पण इतर विषयांच्या तुलनेत पर्यावरण विज्ञान या विषयाला अतिशय दुय्यम स्थान दिले जाते. हा विषय सुरुवातीपासूनच शिकवला गेला तर त्याविषयीची निरक्षरता साक्षरतेत बदलून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा नवोनील दास यांनी व्यक्त केली.

७.८ अब्ज वृक्ष लागवड

‘अर्थ डे नेटवर्क’ने जगभरात २०२० पर्यंत ७.८ अब्ज वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीकरिता एक झाड हा उद्देश यामागे आहे. हवामान बदलामुळे होणाऱ्या विनाश टाळण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे. भारतातसुद्धा येत्या काही महिन्यात ५७५ दशलक्ष झाडे लावण्यात येतील. पूर्वी ‘अर्थ डे नेटवर्क’ने रोटरी इंटरनॅशनलसोबत भागिदारी करुन त्यांच्या ‘हिरवी जादू’ या कार्यक्रमांतर्गत दहा दशलक्ष झाडे लावली. हरित क्षेत्र वाढवायचे तर कार्बन उत्सर्जन करणाऱ्या इंधनापासून ग्रामीण भागातील लोकाना परावृत्त करुन सौरउर्जेच्या वापरासाठी त्यांना प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नात ‘अर्थ डे नेटवर्क’ची चमू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Negative effects of climate change

ताज्या बातम्या